मुंबई : सप्टेंबर महिन्याचे पहिले दोन आठवडे सरले तरी मुंबईमध्ये फारसा पाऊस नाही. याचा परिणाम तापमानावर झाला असून मुंबईत उकाड्यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. कुलाबा येथे कमाल तापमानाचा पारा ३३ झाला आहे. तर सांताक्रूझ येथेही कमाल तापमान ३२ अंशांहून अधिक आहे. एकूणच कोकण विभागात सध्या पारा चढा असून तुलनेने राज्याच्या इतर भागांमध्ये तापमान फारसे चढे नाही.सांताक्रूझ येथे बुधवारी ३२.२ तर कुलाबा येथे ३३.२ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले. सांताक्रूझ येथील कमाल तापमान सरासरीपेक्षा १.६ अंशांनी अधिक होते तर कुलाबा येथील कमाल तापमान सरासरीपेक्षा २.५ अंशांनी अधिक होते. वातावरणामध्ये आर्द्रता कायम असतानाच तापमानवाढ झाल्याने मुंबईकरांना अधिक अस्वस्थता जाणवत होती. किमान तापमानाचा पाराही कुलाबा येथे २६.६ तर सांताक्रूझ येथे २७ अंश सेल्सिअस नोंदला गेला. हे तापमानही सरासपीपेक्षा कुलाबा येथे १.७ अंशांनी तर सांताक्रूझ येथे २.४ अंशांनी अधिक होते. गुरुवारीही कमाल तापमानाचा पारा ३२ अंशांच्या आसपास तर किमान तापमानाचा पारा २७ अंशांच्या आसपास असण्याचा अंदाज आहे. मुंबईत बुधवारी पावसाचा शिडकावा झाला. तर काही ठिकाणी आभाळ ढगाळ होते.मुंबईत कुलाबा केंद्रावर १ ते १३ सप्टेंबर या काळात केवळ तीन दिवस ५० मिलीमीटरहून अधिक पाऊस नोंदला गेला. तर दोन दिवस २० ते ४० मिलीमीटरदरम्यान पावसाची नोंद झाली. सांताक्रूझ येथे एक दिवस १०० मिलीमीटरहून अधिक तर एक दिवस ७५ मिलीमीटरहून अधिक पावासाची नोंद झाली आहे. उर्वरित दिवस मुंबईत पावसाचा केवळ शिडकावा असल्याने उकाड्याची चढती कमान मुंबईकरांनी अनुभवली. बुधवारी मुंबईसह अलिबाग, डहाणू, हर्णे या केंद्रांवरही कमाल तापमानाचा पारा चढा होता. डहाणू येथेही बुधवारी ३३.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. अलिबाग, डहाणू आणि हर्णे या तीनही केंद्रांवर कमाल तापमान हे सरासरीपेक्षा २ अंशांपेक्षा जास्त होते. शुक्रवारपासून कोकण विभागातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर सध्याच्या उकाड्यावर थोडा दिलासा मिळू शकेल. रविवारी पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईत मात्र या आठवड्याच्या अखेरपर्यंत पावसाचा जोर फारसा नसेल असे पूर्वानुमान बुधवारी वर्तवण्यात आले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/uoUr90h
No comments:
Post a Comment