म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यातील श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योर्तिलिंग देवस्थानाच्या विकास कामांसाठी २८६ कोटी ६८ लाख रुपयांच्या, श्री क्षेत्र घृष्णेश्वर तीर्थक्षेत्रासाठी १६३ कोटी रुपयांचा आणि नाशिक जिल्ह्यातील श्री क्षेत्र सप्तश्रृंगी देवी तीर्थक्षेत्राच्या विकासाठी ८१ कोटी ८६ लाख रुपयांच्या सुधारित आराखड्यास सोमवारी मंत्रालयात मान्यता देण्यात आली. तीर्थक्षेत्री येणाऱ्या भाविकांना उत्तम सोयीसुविधा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दक्षता घ्यावी आणि त्या सर्व परिसरात पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करावेत, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची सोमवारी बैठक झाली. या बैठकीस वित्त व नियोजन खात्याचा कार्यभार सांभाळणारे उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे, आ. प्रशांत बंब, मुख्य सचिव मनोज सौनिक, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. गोविंदराज, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, बीड जिल्हाधिकारी दीपा मुधोळ आदी उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.परळी वैजनाथ देवस्थानबीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र परळी येथील ज्योर्तिलिंग तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये ९२ कामांना नव्याने प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या वेळी आराखड्यानुसार करण्यात येणाऱ्या कामांचे सादरीकरण करण्यात आले. मंदिराच्या मागील बाजूच्या जागेवर लाइट अँड साउड शो करण्यात येणार आहे. लेझर शो करताना नागरिकांच्या डोळ्यांना इजा होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितले.घृष्णेश्वर देवस्थानछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र घृष्णेश्वर विकास आराखड्यामध्ये वळण रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे. लेणी क्रमांक एक ते महादेव मंदिर हा नवीन रस्ता १.६५० किमी लांबीचा असून त्यासाठी २७ कोटी ५८ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्याचबरोबर बांधकामासाठी १६ कोटी रुपयांचा वाढीव निधी यानुसार १६३ कोटी रुपयांच्या सुधारित आराखड्यास मान्यता देण्यात आली.नाशिक जिल्ह्यातील श्री सप्तशृंगी देवी विकास आराखड्याबाबत चर्चा झाली. नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी या तीर्थक्षेत्र विकासासाठी ८१ कोटी ८६ लाख रुपयांचा प्रस्ताव सादर केला आहे. हा सुधारित आराखडा २५ कोटींपेक्षा अधिक असल्याने तो ग्रामविकास विभागाकडून नियोजन विभागाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. सुधारित आराखड्यात स्वच्छतागृह बांधणे, डोम बसविणे, दरड कोसळण्यापासून संरक्षणात्मक जाळी बसविणे आदी विविध कामांचा समावेश आहे. या तीर्थक्षेत्राला दोन दिवसांपूर्वी भेट दिल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी या वेळी सांगितले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/HvTAOQ0
No comments:
Post a Comment