म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: दोन हजार रुपये मूल्याच्या नोटा रिझर्व्ह बँकेकडे मोठ्या प्रमाणावर परत येत असल्याचा आनंद रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकार साजरा करत असताना, हा नोटबदल लवकर करून मिळावा, यासाठी रिझर्व्ह बँकेच्याच बाहेर कमिशनरूपी नोटा द्याव्या लागत आहेत.सर्वसामान्य नागरिकांना त्यांनी सांभाळून ठेवलेल्या दोन हजारांच्या नोटा सापडत आहेत. त्याचप्रमाणे मोठे पेमेंट करण्यासाठी काढून ठेवलेले पैसे मिळाल्यावर एखादा व्यावसायिकही त्या नोटा बदलण्यासाठी रांगेत उभा राहत आहे. नोटा परत करण्यास आलेल्या व्यक्तीचे आधार क्रमांक व पॅन क्रमांक पाहूनच त्यांना आत सोडले जाते. रांगेत उभे न राहता तत्काळ नोटा बदलायच्या असतील तर तसा 'मार्ग' रिझर्व्ह बँकेचे सुरक्षारक्षकच दाखवत असल्याचे 'मटा' प्रतिनिधीच्या लक्षात आले.सुरक्षारक्षक आणि रिझर्व्ह बँकेच्या आतील कर्मचाऱ्यांचे काही साटेलोटे असून त्यातून कार्यालयाबाहेर नोटा बदलून दिल्या जातात, असा अनुभव नाशिकच्या एका ज्येष्ठ उद्योजकालाही अलीकडेच आला. आपल्याकडे असलेले दोन हजारच्या नोटेचे एक बंडल रिझर्व्ह बँकेला परत करण्यासाठी जयप्रकाश जोशी हे उद्योजक मुंबईत आले होते. मात्र लांबलचक रांग पाहून निराश होऊन परतत असताना अनधिकृतरीत्या नोटा बदलून देणारे त्यांना भेटले. त्यांनी एका नोटेसाठी ३० टक्के रक्कम मागितली. हे कमिशन खूप वाटल्याने जोशी यांनी ओळखीच्या व्यापाऱ्याकडे या नोटा बदलण्यासाठी दिल्या. सुरुवातीला या व्यापाऱ्याने मैत्री आणि संबंध जपण्याच्या भावनेतून या नोटा नक्की बदलून देतो, असे आश्वासन दिले. प्रत्यक्षात मात्र नोटा बदलून घेताना २२ टक्के कमिशन कापून घेणार असल्याचे सांगितले.दोन हजारांच्या नोटा बँक शाखांतून बदलून घेण्याचा कालावधी ३० सप्टेंबर रोजी संपल्यानंतर रिझर्व्ह बँकेच्या देशातील १९ कार्यालयांतून तसेच भारतीय पोस्टाने या नोटा रिझर्व्ह बँकेकडे पाठवून त्या बदलून देण्याची घोषणा रिझर्व्ह बँकेने केली होती. दररोज हजारो नागरिक रांगेत उभे राहून नोटा बदलून घेत आहेत. या नागिरकांना पाण्याची सुविधा रिझर्व्ह बँकेने पुरवली आहे. तसेच सावलीसाठी तात्पुरते छतही उभारण्यात आले आहे. नागरिकांचा ओघ पाहता ही व्यवस्था अपुरी आहे. रिझर्व्ह बँकेबरोबरच भारतीय स्टेट बँकेच्या देशातील सर्व बँक शाखांतून दोन हजाराच्या परत घेण्याची यंत्रणा कार्यरत करावी, अशी सूचना जोशी यांनी केली आहे.दलालाशी झालेले संभाषणमटा - मला दोन हजारांच्या २० नोटा बदलायच्या आहेत.दलाल - देतो की मी बदलून. एका नोटेसाठी ४०० रुपये द्यायचे.मटा - खूप घेताय हो तुम्ही. काही कमी करा ना.अक्षय - अहो नाहीतरी या नोटा म्हणजे कचराच आहे आता. त्याऐवजी तुम्हाला एका नोटेचे १,६०० रुपये तर मिळतात ना. तुमच्याकडे आत्ता आहेत का नोटा? द्या लवकर. माझा नंबर लिहून घ्या. लवकर आणा नोटा.मटा - या नोटांचे क्रमांक लिहून द्यावे लागतील ना.अक्षय - त्याची काही गरज नाही, कुठलाही फॉर्म भरायचा नाही. एकदम सोपं आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/TLaJ8tY
No comments:
Post a Comment