म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: वाढलेली प्रवासीसंख्या, विमानांची गर्दी, वेळेपूर्वी किंवा वेळेनंतर आगमन होणारी विमाने, यामुळे धावपट्टी व हवाई नियंत्रण कक्षावर आलेला ताण, अशा सर्व स्थितीत मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन विमानांची धावपट्टीवरील टक्कर टळल्याचे समोर आले आहे. २२ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेची नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) चौकशी सुरू केली आहे.मुंबईचे हे विमानतळ देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक व्यग्र विमानतळ आहे. मात्र एकावेळी एकच धावपट्टी वापरात येत असल्याने उड्डाणसंख्येचा विचार केल्यास, हे देशातील सर्वाधिक व्यग्र विमानतळ ठरत आहे. त्या स्थितीत विमानांची गर्दी वाढल्याने अलिकडेच नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने विमानतळाला ४० उड्डाणे रद्द करण्यास सांगितल्याने हे विमानतळ सध्या चर्चेत आहे. गर्दी टाळण्यासाठी मंत्रालयाने १६ फेब्रुवारीपासून उपयायोजना करण्याची सूचना दिली असताना त्याचदरम्यान २२ फेब्रुवारीला संभाव्य टक्कर टळल्याची धक्कादायक घटना घडली.विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर अस्ताना या कझाकिस्तानच्या सरकारी विमानसेवा कंपनीच्या अल्माटी येथे जाणाऱ्या विमानाला, हवाई नियंत्रण कक्षाने (एटीसी) उड्डाणासाठी धावपट्टीला समांतर असलेला टॅक्सी वे घेत अन्य विमानांच्या मागे उड्डाणासाठी रांगेत उभे राहण्याची सूचना दिली होती. मात्र संबंधित वैमानिकाने त्याआधीच डावीकडील वळण घेत धावपट्टीला छेदून जाणाऱ्या टॅक्सी वेचा उपयोग केला. त्यामुळे एअरबस ३२० जातीचे हे विमान धावपट्टीवरून उड्डाण सुरू केलेल्या एअर इंडियाच्या दोहा येथे जाणाऱ्या एअरबस ३१९ जातीच्या विमानाला आडवे आले. समोर विमान दिसताच एअर इंडियाच्या वैमानिकाला आपत्कालिन ब्रेक दाबत उड्डाण रोखावे लागले. दुसरीकडे एअर इंडियाच्या विमानाच्या उड्डाणानंतर इंडिगो एअरलाइन्सच्या नागपूरहून येणाऱ्या विमानाला धावपट्टीवर उतरायचे होते. मात्र एअर अस्तानाचे विमान तिथे आडवे असल्याने इंडिगोच्या विमानाला तातडीने आकाशातच घिरट्या घालण्याची सूचना एटीसीला द्यावी लागली. ही सर्व घटना दुपारी ३च्या सुमारास घडली. व एटीसीने प्रसंगावधान राखल्याने विमानांची टक्कर व मोठा अपघात टळला.अशी घटना घडल्याच्या वृत्ताला विमानतळ व्यवस्थापनातील सूत्रांनी दुजोरा दिला आहे. एअर अस्तानाचा संबंधित वैमानिक नवा असून तो पहिल्यांदाच मुंबईच्या विमानतळावर आल्याने त्याची माहिती अपुरी होती. तसेच विमानाने एकदा इंजिन सुरू करून उड्डाणाची तयारी सुरू केली की त्यापुढील जबाबदारी एटीसीची असते. त्यामुळेच विमानतळ व्यवस्थापनाचा थेट संबंध नाही, असे संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे.
एटीसीकडून तक्रार नोंद दाखल
ही घटना घडली त्यावेळी संबंधित तिन्ही कंपन्यांची (एअर अस्ताना, एअर इंडिया व इंडिगो एअरलाइन्स) उड्डाणे भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एएआय) एटीसीच्या अधिपत्यात होती. त्यामुळे संबंधित घटनेची तक्रार नोंद 'एएआय'नेच 'डीजीसीए'कडे केली आहे. 'एएआय'च्या नोंदीमुळेच तपास सुरू असल्याचे 'डीजीसीए'ने म्हटले आहे.'टॅक्सी वे' काय असतो?
विमानतळावर विमाने उभी करण्याची जागा व धावपट्टी यामध्ये अंतर असते. त्यामुळे विमाने धावपट्टीवर उतरल्यावर किंवा धावपट्टीकडे जाण्यासाठी विशेष मार्ग उभे केले जातात. त्यांनाच 'टॅक्सी वे' संबोधले जाते.वेग ४० नॉट
ही घटना घडली त्यावेळी एअर इंडियाच्या दोहासाठी उड्डाण करणाऱ्या विमानाचा वेग ४० नॉट (ताशी जवळपास ७५ किमी) इतका होता. एरव्ही विमाने आकाशात जवळपास ३०० नॉट वेगाने उडतात. त्यामुळेच विमानाचा आकार व एकंदर हवाई क्षेत्राचा विचार केल्यास, तसा हा वेग फार नाही, असे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/DokxJIZ
No comments:
Post a Comment