म. टा. वृत्तसेवा, : उन्हाळ्याला नुकतीच कुठे सुरुवात होत नाही तोच तालुक्यातील हजारो ग्रामस्थांचे पाण्याचे नियमित स्रोत आटले असून त्यांना आता पाण्यासाठी टँकरवर अवलंबून रहावे लागत आहे. जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात शहापूर तालुक्यातील नऊ गावे आणि ४३ पाड्यांना १५ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पुढील दोन-अडीच महिन्यांत टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत जाणार आहे.शहापूर तालुक्याची पाणीटंचाई दूर करण्यासाठी सरकारने विविध उपाययोजना राबवल्या असल्या तरी अद्याप येथील पाण्याचे दुर्भिक्ष्य कमी होऊ शकलेले नाही. घरातील पाण्याची व्यवस्था करण्यासाठी येथील महिलांना खूप कष्ट करावे लागतात. दूरवरून हंडे आणि कळशांमधून पाणी वाहून आणावे लागते.सध्या फुगाळे, दांड, कळभोंडे, कोथळे, मांळ, विहीगांव, उम्रावणे, उंबरखांड आणि पिंपळपाड या नऊ गावांना टँकरने पाणीपुरवठा होत आहे. या व्यतिरिक्त नारळवाडी, पारधवाडी, अघाणवाडी, भुईपाडा, चिंतामणीवाडी, बिंबळवाडी, कोळीपाडा, तेलमवाडी, कातवारवाडी, वारेपाडा, भाकरेपाडा, वरचा गायदरा, बोंडारपाडा, भस्मेपाडा, राईची वाडी, सखाराम पाडा, आंब्याचा पाडा, वारघड वाडी, दुब्याची वाडी, काटीचा पाडा, सुगांव, डोंगरीपाडा, काजूपाडा, उंबरवाडी आदी ४३ पाड्यांना सध्या १५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. टँकरने काही गावातील विहिरींमध्ये पाणी टाकले जाते आणि तिथून ग्रामस्थ ते पाणी घेतात. काही गावांमध्ये थेट टँकरसमोर रांग लावून ग्रामस्थ पाणी भरतात.विहिरींनी तळ गाठला आणि कूपनलिका कोरड्या झाल्या की शहापूरमधील ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू होते. घरातील एखाद दुसरी व्यक्ती संपूर्ण दिवस पाणी भरत राहाते. अनेकदा पाण्यासाठी त्यांना रात्री जागरण करावे लागते. बहुतेक घरांमध्ये पाणी आणण्याची जबाबदारी घरातील महिलांवर असते. त्यामुळे या चार महिन्यांत त्यांचे खूप हाल होतात. नदीपात्रात खड्डे खोदून (डोवरे) काही ठिकाणी महिला पाणी भरताना दिसतात. काही विहिरींमध्ये क्षीणसा झरा सुरू असतो. रात्रभर तळाला साठलेले पाणी अक्षरश: वाटी-पेल्याने जमा करून हंड्यात टाकण्याची कसरत महिलांना करावी लागते. टँकरने पुरवलेल्या पाण्याच्या शुद्धतेचा प्रश्न असतो. काहीजण या काळात बाटलीबंद पाणी पितात. मात्र गरीब कुटुंबे तेच टँकरचे अथवा मिळेल तिथून आणलेले पाणी गाळून, उकळून पितात. अशुद्ध पाणी प्यायल्यामुळे त्यांचे आरोग्यही बिघडते.
१५ हजार ग्रामस्थ टंचाईग्रस्त
तूर्त या परिसरातील १५ हजार २०५ ग्रामस्थ पाणीटंचाईने बाधीत आहेत. त्यांना पाण्यासाठी टँकरशिवाय अन्य कोणताही पर्याय नाही. जून महिन्यात पाऊस पडेपर्यंत त्यांना अशा पद्धतीने पाण्याच्या दुर्भिक्ष्याचा सामना करावा लागणार आहे. पुढील दोन महिन्यांत टँकरग्रस्त गावपाडे आणि तेथील रहिवाशांची संख्या वाढणार आहे.from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/IGJVPNc
No comments:
Post a Comment