Breaking

Sunday, June 14, 2020

दोन महिन्यानंतर मुंबईत रेल्वे धावली; चर्चगेटहून विरारला पहिली लोकल रवाना https://ift.tt/30JtGZo

मुंबई: करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर मुंबईतील जीवनवाहिनी समजली जाणारी लोकल बंद करण्यात आली होती. मात्र, आज तब्बल दोन ते अडीच महिन्यानंतर मुंबईत लोकल धावली. आज पहाटे साडे पाच वाजता चर्चगेटहून विरारसाठी पहिली लोकल रवाना झाली. त्यामुळे मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच ही लोकल सुरू करण्यात आली आहे. पहाटे रवाना झालेल्या पहिल्या ट्रेनमध्ये एकही प्रवासी नव्हता. मात्र, दुसऱ्या संपूर्ण ट्रेनमध्ये केवळ तीन ते चार प्रवासी होते. अनेकांना ट्रेन सुरू झाल्याचं माहीत नसल्याने हे चित्रं होतं. सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळत हे प्रवासी बसले होते. लोकलमध्ये नेहमी सारखी गर्दी नसली तरी तब्बल दोन महिन्यानंतर प्रवाशांना लोकल प्रवासाचा आनंद घेता आला. सर्व सामान्य नागरिकांना या लोकलमधून प्रवास करण्यास मुभा नसेल. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळता यावेत म्हणून एका फेरीत केवळ ७०० प्रवासीच प्रवास करू शकणार आहेत. तसेच रेल्वेतून प्रवास करताना मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच प्रवाशांनी विनाकारण गर्दी करू नये असं आवाहन रेल्वेकडून करण्यात आलं आहे. शेवटची लोकल रात्री ११.३० वाजता सुटणार आहे. अप आणि डाउन दिशेला दर १५ ते २० मिनिटांनी लोकल धावणार आहे. पश्चिम रेल्वेच्या लोकल , मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे, अंधेरी, बोरिवली या स्थानकांवर व त्यानंतर दहिसर ते विरार दरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील. मध्य आणि हार्बरवर जलद मार्गावर लोकल चालवण्यात येणार आहेत. चर्चगेट-विरार, विरार-डहाणू, सीएसएमटी-कल्याण, सीएसएमटी-पनवेल या मार्गांवर लोकल धावतील. अत्यावश्यक सेवेचे ओळखपत्र पाहूनच प्रवाशांना रेल्वे स्थानकांत प्रवेश देण्यात येईल. इतर प्रवाशांना लोकलमधून प्रवास करता येणार नाही. दरम्यान, 'रेल्वे स्थानकात प्रवेश करणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या ठिकाणी प्रवासी रांग, थर्मल स्क्रीनिंग करण्याची जागा, पार्किंगची व्यवस्था या ठिकाणी आवश्यकतेनुसार बंदोबस्त करावा', असे आदेश रेल्वे पोलिसांच्या नियंत्रण कक्षातून सर्व रेल्वे पोलिसांना देण्यात आले होते, त्यानुसार रेल्वे स्थानकांवर पोलिसांचा बंदोबस्त दिसत होता.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3d1Agg8

No comments:

Post a Comment