मुंबई: राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार तीन चाकीच आहे. रिक्षाच आहे ती गरीबांची. तीन चाकी तर तीन चाकी. पण स्टिअरिंग माझ्याच हाती आहे, पाठीमागे दोघे बसले आहेत. आमच्या सरकारचं मस्त चाललंय, अशा शब्दात मुख्यमंत्री यांनी टीकाकारांना उत्तर दिलं. राज्यातील आघाडी सरकारवर हे तीन चाकी सरकार असल्याने पायात पाय घालून केव्हाही पडेल, अशी टीका केली जात आहे. त्यावर भाष्य करताना उद्धव ठाकरे यांनी टीकाकारांना हे उत्तर दिलं. महाआघाडी व्यवस्थित आहे. कुरकुर... कुरबूर असं काहीच नाही. एक गोष्ट स्वीकारली पाहिजे आणि ती मी नक्कीच स्वीकारतो की, गेल्या दोन-तीन महिन्यांत फेस टू फेस गाठीभेटी अवघड झाल्या आहेत. त्यामुळे फोनवरून किंवा व्हिडीओच्या माध्यमातून गाठीभेटी थोड्याफार सुरू असतात, असं ते म्हणाले. आमचं सरकार तीन चाकी आहे. रिक्षासारखं. गरीबांचं वाहन आहे ते. बुलेट ट्रेन की रिक्षा यात निवडायचं झालं तर मी रिक्षाच निवडेन. मी गरीबांच्या मागे उभा राहीन. ही माझी भूमिका मी बदलत नाही. कोणी असा समज करून घेऊ नये की, आता मी मुख्यमंत्री झालो म्हणजे बुलेट ट्रेनच्या मागे उभा राहीन. नाही, मी एवढंच म्हटलंय, मी मुख्यमंत्री या नात्याने सर्वांगीण विचार करेन. माझं मत मी लोकांच्या सोबत असल्याने बुलेट ट्रेन नको हे आहेच, पण आतासुद्धा सगळ्यांच्या मताने बुलेट ट्रेन नको असेल तर मी नाही करणार. म्हणून तीन चाकं तर तीन चाकं… ती चालताहेत ना एका दिशेने. मग तुमच्या पोटात का दुखतंय! केंद्रात किती चाकं आहेत? आमचं तर हे तीन पक्षांचं सरकार आहे. केंद्रात किती पक्षांचं सरकार आहे, सांगा ना! मी जेव्हा गेल्या वेळी एनडीए मीटिंगला गेलो होतो तेव्हा तर ३०-३५ चाकं होती. म्हणजे रेल्वेगाडी होती, अशी टीकाही त्यांनी केली. सत्तेचं म्हणाल तर एका पक्षाचं सरकार याच्यासारखं मोठं स्वप्न नाहीय. पण हे तुमचं व्यक्तिगत स्वप्न असेल तर त्याचा काडीचाही उपयोग नाहीय. काडीची किंमत नाहीय. कारण त्या स्वप्नामध्ये जनतेची स्वप्नं येत नाहीत तोपर्यंत एकहाती सरकार येत नाही आणि ती स्वप्नं सरकार येऊनही पूर्ण होत नसतील तर त्याला जनताच काडी लावल्याशिवाय राहणार नाही. आता महाराष्ट्राने जो एक वेगळा प्रयोग केला आहे, विचारांनी भिन्न असलेले तीन पक्ष हे एका विचित्र राजकीय परिस्थितीत एकत्र आले आहेत. त्यात केवळ आणि केवळ अपरिहार्यता असून मुख्यमंत्री पदाची ही खुर्ची मी स्वीकारली. हे मानाचं पान आहे, मानाचं पद आहे. खूप मोठं आहे, पण हे माझं स्वप्न कधीच नव्हतं, पण आता मी ते स्वीकारलंय, असंही ते म्हणाले. सरकारमध्ये राष्ट्रवादीला झुकतं माप मिळत असल्याचा काँग्रेसचा प्रेमळ गैरसमज होता. पण भेटीनंतर तो दूर झाला. पण तीव्र नाराजी वगैरे असं काही नव्हतं. तसं काँग्रेसने ठामपणे सांगितलं नाही, असं सांगतानाच लोकप्रतिनिधी निवडून येतात. त्यामुळे जनतेच्या त्यांच्याकडून काही अपेक्षा असतात. त्या पूर्ण होत नसतील तर लोकप्रतिनिधींनी त्यांच्या काही भावना व्यक्त केला तर त्यात वावगं असं काही नाही. शेवटी त्यांनाही मतदारांना उत्तर द्यावे लागतेच, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी नेहमी चर्चा होत असल्याचंही स्पष्ट केलं.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2OTqnaM
No comments:
Post a Comment