मुंबई: ज्याची कुवत कमी लेखल्या गेली तोच एका बड्या पक्षाचा सर्वोच्च नेता झाला. तोच देशातील महत्त्वाच्या राज्याचा मुख्यमंत्री झाला. जगात बहुदा माझंच हे एकमेव उदाहरण असावं, असं सांगत मुख्यमंत्री यांनी त्यांच्या टीकाकारांना उत्तर दिलं. उद्धव ठाकरे यांनी आज पहिल्यांदाच त्यांच्या नेतृत्वावर आक्षेप घेणाऱ्यांवर टीका केली. मला वाटतं, जगात माझंच असं एकमेव उदाहरण असेल की, ज्याची कुवत सगळ्यात कमी लेखली गेली तो पक्षाचा सर्वोच्च नेता झाला आणि याची कुवत नाही, याला काही कळत नाही असं काही जण बोलायचे, पण तोच राज्याचा मुख्यमंत्री झाला, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. पण साठाव्या वर्षी मुख्यमंत्री झालो असलो तरी याच‘साठी’ केला होता अट्टहास असं नाहीय, असंही त्यांनी सांगितलं. मला भाषण करता येत नव्हतं आणि आताही येत नाही. एकदा तर असं झालं, एका ठिकाणी मला जोरजबरदस्ती बोलावलं आणि तेव्हा मी ठरवलं, भाषण करायचंच. लोकांना कळू दे, मला भाषण करता येत नाही ते. मी भाषण आधी लिहिलं, पाठ करून गेलो. माईकसमोर उभा राहिल्यावर मला भाषणच आठवेना, पण त्या वेळेला मला जे सुचलं ते बोललो आणि त्याही भाषणाला मला टाळ्या मिळाल्या. असंच भाषण करत करत मी इथपर्यंत आलो. म्हणजे अनुभव एखाद्या गोष्टीचा तुम्हाला असायलाच पाहिजे असं नाहीय. तुमच्या हृदयात, अंतःकरणात तळमळ पाहिजे. तळमळ महत्त्वाची आहे. तळमळ हवी आणि मी तळमळीने काम करतो, असं सांगतानाच शेवटी मुख्यमंत्री म्हणजे काय हो, त्याला शिंगं फुटतात का? मला असंच राहायचं आहे! शेवटी माझ्यासाठी जनतेचा आशीर्वाद महत्त्वाचा. तो आहे तोपर्यंत चिंता नाही, असं ते म्हणाले. कोणताही विरोधी पक्षांतला नेता दाखवा, जो दुसऱया पक्षात जाऊन सर्वोच्च पदावर गेलाय, मुख्यमंत्री झालाय. तुम्हाला तुमच्या पक्षात असं काय मिळत नाहीय की, तुम्ही दुसऱया पक्षात जाताय. कित्येक ठिकाणी अशी उदाहरणं आहेत, अशी फोडाफोडी होते त्यामागे ‘वापरा आणि फेकून द्या’ ही नीती सर्वांनी अवलंबली आहे, असं त्यांनी फोडाफोडीच्या राजकारणावर बोलताना सांगितलं.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/32V8ukc
No comments:
Post a Comment