मुंबई: राज्यात दररोज सरासरी ८ हजार रुग्ण सापडत असले तरी मुंबईतून मात्र पॉझिटिव्ह न्यूज आहे. मुंबईत करोनावर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण आले असून सध्या मुंबईत १८ हजारापेक्षा कमी रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईसाठी ही दिलासादायक बाब असून रुग्ण संख्या कमी झाल्याने आरोग्य यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. मुंबईत करोना रुग्णांची संख्या १ लाख १० हजार ८४६ एवढी होती. त्यापैकी ८५ हजार ३२७ पेक्षा अधिक रुग्ण बरे झाले आहेत. सध्या एकूण १७ हजार ८६२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. म्हणजेच सक्रिय रुग्णांची संख्यादेखील आता १८ हजारापेक्षाही कमी झाली आहे, असं मुंबई महापालिकेने म्हटलं आहे. मुंबईत एकीकडे दैनंदिन चाचण्यांची संख्या, त्याची सरासरी वाढली असली तरी नवीन रुग्ण आढळण्याची सरासरीदेखील पूर्वीच्या तुलनेत कमी झाली आहे. सोबतच प्रभावी उपचारांमुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. या दुहेरी कामगिरीमुळे उपचार सुरु असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्यादेखील आता कमी होऊ लागली आहे, असंही पालिकेने स्पष्ट केलं आहे. मुंबईत रुग्ण वाढीचा सरासरी दर आता १ टक्क्यापेक्षाही कमी झाला आहे. तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ७० दिवसांच्या पार गेला आहे. एवढेच नव्हे तर, मुंबईत करोनाची लागण तपासण्यासाठी करण्यात येणाऱ्या चाचण्यांनी ५ लाखांचा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे २८ जुलै रोजी अवघ्या एकाच दिवसात ११ हजार ६४३ चाचण्या करण्यात आल्या असून हा मुंबईतील एका दिवसातील चाचण्यांचा आतापर्यंतचा उच्चांकदेखील आहे. तत्पूर्वी २७ जुलै रोजीच्या २४ तासांमध्ये देखील ८ हजार ७७६ चाचण्या करण्यात आल्या होत्या. पूर्वीच्या दैनंदिन सरासरी चाचण्यांच्या तुलनेत हा वेग आता दुप्पटीपेक्षा अधिक झाला आहे. ३ फेब्रुवारी रोजी मुंबईत पहिली करोना चाचणी करण्यात आली. सुरुवातीला ३ फेब्रुवारी ते ६ मे २०२० या कालावधीमध्ये मुंबईत १ लाख चाचण्यांचा टप्पा गाठला गेला. नंतर १ जून २०२० रोजी २ लाख चाचण्यांचा टप्पा गाठला गेला. म्हणजेच १ लाख ते २ लाख हा टप्पा गाठण्यासाठी २५ दिवस लागले. त्यानंतर २४ जून रोजी ३ लाख चाचण्यांचा टप्पा पूर्ण झाला. म्हणजे २ लाख ते ३ लाख हा टप्पा २३ दिवसांत गाठला गेला. तर १४ जुलै रोजी ४ लाख चाचण्यांचा टप्पा पूर्ण झाला. ३ लाख ते ४ लाख चाचण्या हा टप्पा २० दिवसांत पार पडला. २९ जुलै रोजी ५ लाख चाचण्यांचा टप्पा गाठला गेला असून ४ लाख ते ५ लाख चाचण्यांचा टप्पा अवघ्या १५ दिवसांमध्ये गाठण्यात आला आहे. यातून चाचण्यांचे लाखा-लाखांचे हे टप्पे गाठताना त्यातील दिवसांचे अंतर सातत्याने कमी होत आहे, याचाच अर्थ दैनंदिन सरासरी चाचण्यांचा वेग वाढला आहे, त्याची सरासरी वाढली आहे, असं पालिकेने म्हटलं आहे. मुंबईत रुग्णवाढीचा सरासरी दर आता ०.९७ टक्के इतका नोंदवला गेला असून १ टक्क्याच्याहीखाली हा दर आल्याने मुंबईकरांसाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरली आहे. मुंबईतील २४ प्रशासकीय विभागांचा विचार करता, एकूण १८ म्हणजे दोन तृतीयांश विभागांमध्ये १ टक्के किंवा त्यापेक्षा कमी रुग्णवाढ दर आहे. मुंबईत रुग्णवाढ दुप्पट होण्याचा सरासरी कालावधी देखील प्रथमच सत्तरीपार गेला आहे. हा सरासरी कालावधी आता ७२ दिवसांचा झाला आहे. यातही विशेष म्हणजे, मुंबईतील २४ प्रशासकीय विभागांपैकी १४ विभागांमध्ये रुग्णवाढ दुप्पट होण्याचा सरासरी कालावधी हा ७२ दिवस किंवा त्यापेक्षा अधिक आहे. त्यातही चार विभाग ९० दिवसांपेक्षा अधिक तर दोन विभाग १०० दिवसांपेक्षा अधिक दिवसांची सरासरी राखून आहेत. रुग्ण दुप्पट होण्यासाठी अधिक कालावधी म्हणजे संसर्गाचा फैलाव तितकाच मंदावला, असा त्याचा अर्थ असतो. त्यामुळे रुग्णवाढ दुप्पट होण्याचा कालावधीदेखील सातत्याने वाढता असून संसर्गावर नियंत्रण मिळाल्याचे ते द्योतक आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2DheuZO
No comments:
Post a Comment