Breaking

Wednesday, December 2, 2020

१०५चे १५० आमदार होतील; फडणवीसांनी सांगितला 'हा' फॉर्म्युला https://ift.tt/2VwTDHQ

मुंबई : 'राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा आमचा कोणताही प्रयत्न नाही. हे सरकार महाआघाडीतील अंतर्गत विरोधातूनच कोसळेल. त्यावेळी एक मजबूत सरकार देईल. आमच्याकडे सध्या १०५ आमदार असले तरी त्याचे १५० आमदार कसे होतात, हे मी सांगण्याची गरज नाही. तेव्हा तशी परिस्थिती निर्माण होत असते. त्यामुळे हे सरकार पडले, की १०५ आमदारांचे १५० आमदार कसे होतील, हे तेव्हा दिसेल', असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते यांनी केले. राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीबद्दल फडणवीस यांनी आपली मते मांडली. 'महाराष्ट्र टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस यांनी, महाविकास आघाडीचे सरकार हे पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार नाही, असे भाकीत केले. तसेच भाजपचे सरकार येईल आणि बहुमताचा १४५ हा आकडाही पार केला जाईल, असे भाष्य केले. सन २०१९च्या विधानसभा निवडणुकीत फडणवीस यांनीच पुढाकार घेऊन शिवसेनेशी युती केली होती. पण भाजपचे १०५ आमदार निवडून येऊनही सत्तेचे स्वप्न भंगले. युती केल्याचा पश्चाताप होतो का..., असे विचारले असता ते म्हणाले, '२०१९च्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने भाजप-शिवसेना युतीला कौल दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभांमधून तसेच शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीतही मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून माझा उल्लेख केला होता.... त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला हे सर्व माहीत आहे. कुणी जनतेची फसवणूक केली, हे जनतेलाही ठाऊक आहे', असे फडणवीस म्हणाले. भाजपमधील नेत्यांच्या त्यावेळच्या मतांविषयी विचारले असता ते म्हणाले, '२०१९ची निवडणूक भाजपने स्वबळावर लढली पाहिजे, असे पक्षातील अनेक नेत्यांचे मत असेल. पण लोकसभा निवडणूक आम्ही शिवसेनेला सोबत घेऊनच लढली पाहिजे, अशी माझी इच्छा होती. शिवसेनेला सोबत न घेता विधानसभा लढणे हे नैतिकदृष्टया योग्य नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मत होते. लढलेल्या जागांपैकी भाजप ६५ ते ७० टक्के जागा जिंकला. त्यानंतर जे घडले ते सगळ्यांनी पाहिले आहे. त्यामुळे पश्चातापापेक्षा अशा घटनांतून शिकले पाहिजे. शिकून पुढे गेले पाहिजे.'


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/37pIVZ4

No comments:

Post a Comment