म. टा वृत्तसेवा, धावत्या लोकलमध्ये चढून महिलेशी अश्लील वर्तन करत तिच्यासोबत झटापटी करून पळून गेलेल्या आय्यान अजीम बेग (१९) या तरुणाला वाशी रेल्वे पोलिसांनी विनयभंगाच्या गुन्ह्याखाली अटक केली. शुक्रवारी सकाळी वाशी ते मानखुर्ददरम्यान धावत्या लोकलमध्ये ही घटना घडली होती. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी रविवारी या आरोपीला अटक केली. या घटनेतील तक्रारदार ४५ वर्षीय महिला घणसोली येथे राहण्यास असून त्या परेल येथे कामाला आहेत. गेल्या शुक्रवारी सकाळी सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास कामावर जाण्यासाठी घणसोली येथून ट्रान्स हार्बर मार्गावरून वाशी येथे आल्या होत्या. त्यानंतर त्या वाशी रेल्वे स्थानकातून लोकलने मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी लोकलच्या महिला डब्यात चढल्या. त्याचवेळी त्यांच्या पाठोपाठ आरोपी अय्यान अजीम बेग हा महिला डब्यात चढला. यावेळी डब्यामध्ये पीडित महिला एकटीच असल्याची संधी साधून आरोपीने महिलेसोबत लगट करण्यास सुरुवात केली. त्याला प्रतिकार केल्यानंतर आरोपीने तिच्यासोबत झटापट केली. मानखुर्द रेल्वे स्थानक येईपर्यंत लोकलमध्ये हा प्रकार सुरू होता. मानखुर्द रेल्वे स्थानकात आल्यानंतर आरोपीने धावत्या लोकलमधून उडी टाकून पलायन केले. वाशी रेल्वे पोलिसांनी आरोपीविरोधात विनयभंगाचा दाखल करून सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून शोध घेतला. शनिवारी तो वाशी रेल्वे स्थानकात आला असताना, त्याला अटक करण्यात आल्याची माहिती वाशी रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू केसरकर यांनी दिली. आरोपी अय्यान हा मानखुर्द भागात राहण्यास असून तो नशेबाज आहे. मोबाइल हिसकावल्याचा गुन्हाही तच्याविरोधात दाखल असल्याचेही केसरकर यांनी सांगितले. महिलेचा धावत्या लोकलमध्ये विनयभंग केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर काही महिला संघटनांनी वाशी रेल्वे पोलिस ठाण्यात धडक देऊन आरोपीला ताब्यात देण्याची मागणी केली. त्यासाठी महिलांनी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/34Qx7OV
No comments:
Post a Comment