Breaking

Monday, December 28, 2020

बाळ बोठेचा आणखी एक प्रताप समोर; खंडणीचा गुन्हा दाखल https://ift.tt/3hwlAtl

अहमदनगर: रेखा जरे खून प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार याच्याविरुद्ध आता खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोकरी घालविण्याची भीती घालून दहा लाख रुपयांची खंडणी मागितली आणि ती न दिल्याने वृत्तपत्रात बातम्या प्रकाशित करून आपली बदनामी केली, अशी फिर्याद एका महिलेने दिली आहे. यामध्ये बोठेसह वैद्यकीय अधिकारी डॉ. भागवत दहीफळे याच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Booked in Extortion Case) सोमवारी रात्री उशिरा तोफखाना पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगल किसन हजारे-भुजबळ (वय ३८, रा. सागर कंपलेक्स स्टेशन रोड, आगरकर मळा, अहमदनगर) यांनी यासंबंधी फिर्याद दिली आहे. १० जुलै २०१९ ते १२ डिसेंबर २०२० या काळात हा गुन्हा घडल्याचे त्यांनी म्हटले आहे. पोलिसांनी या दोन्ही आरोपींविरुद्ध संगमनत करून खंडणी मागितल्याचा आणि बदनामी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीत मंगल हजारे-भुजबळ यांनी म्हटले आहे की, आपण जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात क्षयरोग केंद्रात वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक म्हणून कंत्राटी पद्धतीने कार्यरत होतो. १० जुलै २०१९ रोजी बाळ बोठे याने माहितीचा अधिकार कायद्याखाली अर्ज करून हजारे यांची वैयक्तिक माहिती मागविली होती. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या विभागात करोडो रुपयांचा भ्रष्ट्राचार केला असे निवेदन यशस्विनी महिला ब्रिगेडतर्फे या कार्यालयात देण्यात आले. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात स्मिता अष्टेकर यांनी आणखी असेच निवेदन दिले. या निवदेनांच्या बातम्या फक्त बोठे कार्यकारी संपादक असलेल्या वृत्तपत्रातच येत होत्या. त्यावर आपण पत्रकार परिषद घेऊन या बातम्या कशा चुकीच्या आहेत, हे पुराव्यानिशी दाखवून दिले होते. त्यानंतर दोन दिवसांनी बोठे याने मला चर्चा करण्यासाठी बोलाविले. तेव्हा आम्ही माझ्या कार्यालयाच्या बाहेर सिव्हिल हॉस्पिटल कंपाऊंडजवळ भेटलो. बोठे म्हणाला की तुमच्या कार्यालयातील अधिकारी डॉ. भागवत दहीफळे माझे चांगले मित्र असून ते मला सर्व गोपनीय माहिती पुरवितात. त्यानुसार बरीच माहिती मला प्राप्त झाली आहे. तुम्ही कार्यालयाची परवानगी न घेता महापालिकेची निवडणूक लढविली आहे. ही महत्वाची माहिती माझ्या हाती लागली आहे. जर यातून सहीसलामत बाहेर पडायचे असेल तर मला दहा लाख रुपये द्यावे लागतील. आपण हे शक्य नसल्याचे त्याला सांगितले. त्यावर त्याने तुमची नोकरी नक्कीच जाणार, असे मला सांगितले. त्यानंतर बोठे याने आमच्या कार्यालयातील डॉ. दहीफळे याला हाताशी धरून, आपल्या पदाचा गैरवापर करून, वरिष्ठांवर दबाव आणून मला कंत्राटी नोकरीतून बडतर्फ करण्यास भाग पाडले. या विरोधात आपण हायकोर्टात दाद मागितली होती. तेथे कोर्टाने निकाल दिला की कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांसाठीचे नियम कंत्राटी कर्मचाऱ्यांना लागू होत नाहीत. असे असूनही बोठे काम करीत असलेल्या वृत्तपत्रात १२ फेब्रुवारी २०२० रोजी बातमी आली की, मंगल भुजबळ यांची बडतर्फी हायकोर्टातही कायम. अशी चुकीची बातमी छापून बोठे याने माझी बदनामी केली. त्यामुळे माझी नोकरीवर फेरनियुक्ती न झाल्याने मी नोकरीपासून वंचित राहिले, असे फिर्यादीत म्हटले आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2JpiF98

No comments:

Post a Comment