२०२०? नको रे बाबा! हे वर्ष आता परत आठवणे नाही... २०२०? कशाला बाबा तो विषय? २०२०? अ ब्लॅक इअर.. हे आणि असं अजून बरंच काही, सध्या आपण अनेक गल्ली बोळात, नाक्यावर, चौकात ऐकतोय. कोणाचे जॉब गेलेत, कोणाचे जीवाभावाचे लोक गेले, काहींना खरे मित्र कोण ते कळलं आणि काहींना कोण आपलं नाही तेही देखील कळलं. २०२० कडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगवेगळा असू शकतो. ज्याला जशी प्रचीती येते, तसा त्याचा परमेश्वर. २०२० हे वर्ष अनेक अर्थी आपल्याला ढवळून काढणारं होतं. मानसिक, आर्थिक आणि भावनिकदृष्ट्या. माझ्यासाठी २०२० होतं, एक टर्निंग पाँइंट. १७ मार्च २०२० पासून कुणकुण लागली की आता एक छोटा ब्रेक लागणार आहे. घरी राहायचं. पहिल्यांदा जाम मजा वाटली. मी, बायको, माझी मुलगी शनाया आणि माझे बाबा. चौघेच घरात. काही दिवस नाटकांचे दौरे नाही. कॉल टाइम नाही. निवांत पडून राहायचं, टीव्ही बघायचा, गप्पा, पत्ते, धमाल. घराच्या खिडकीतून डोकावून पाहिलं तर अक्षरशः रस्ते ओस पडलेले. मुंबई सारखं एक धावणारं शहर शांत झालं. पाच दिवस उत्तम पार पडले. काळजी घेतली जात होती. मग लोक एक-एक उपाय सुचवायला लागले. बरेच दिवस घरी असल्यानं काही गोष्टी जाणवू लागल्या. घरच्या बाईंना आपण बरीच भांडी घासायला लावतो. मुलीला छान गुणगुणता येतं. बाबांना नेमक्या कोणत्या सिरीयल आवडतात? बायकोच्या कपाटात एकूण किती ड्रेस आहेत? म्हणजे ज्या गोष्टी रोज फक्त दिसायच्या त्याकडे आपण बघायला लागलो. रोज उठायची गडबड नाही, दाढी करून फ्रेश चेहरा घेऊन बाहेर जायचं नाही. उद्या सकाळी गाडी पाठवतो असा मेसेज नाही. वाटलं की यार असं जगण्यात पण मजा आहे. अनेकांना जाणवलं, की जे काम करण्यासाठी मरमर करत आपण ऑफीसला जायचो ते काम घरूनही होऊ शकतं. सगळं छान चालू होतं, पण लॉकडाउन वाढत गेलं; आधी दिवसांनी, मग आठवड्यांनी, आणि मग महिन्यांनी. आम्ही घरात एक नियम करून घेतला की काहीही झालं तरी जेवण मात्र एकत्र करायचं. छोटी छोटी कामं आपण केली की ते काम करणाऱ्यांना थोडी मदत होते. बाबांनी वाळलेल्या कपड्यांची घडी घालायला सुरुवात केली. मुलीनं घरातील छोट्या कामांचा हातभार उचलला. स्वयंपाक वाटून घेतला. असं म्हणतात की कोणत्याही आनंदाला त्याची अशी एक एक्स्पायरी असतेच. काही गोष्टी जशा नव्यानं कळल्या, तसं त्याच्या मर्यादाही स्पष्ट होऊ लागल्या. माझ्या बाबांनी एकदा जेवताना विचारलं की हे ओटीटी (ओव्हर द टॉप) म्हणजे नेमक काय? त्यावेळी त्यांना मी ते समजावून सांगितलं आणि काही वेब सीरिज दाखवल्या. त्यावर बाबांनी विचारलं की ओटीटी म्हणजे फक्त न्यूडिटी , अश्लील भाषा, अति हिंसा हेच असतं का? आणि जाणवलं की इतक्या गोष्टी बघण्यासाठी आहेत, पण खरंच माझ्या बाबांना बघता येईल, अस आपल्याकडे काय आहे? ज्या टेबलवर जेवताना आम्ही घरातील १९ ते ८४ वयाचे लोक एकत्र बसतो, त्यांना एकत्र बघता येईल असं काय आहे? मग ज्या मराठी रसिकांनी नाटक जगवलं, चित्रपट जगवला, किंबहुना मालिकांनाही भरपूर टीआरपी मिळवून दिला, त्यांना ओटीटीवर पाहता येईल असा मराठी आशय का नाही? यावर चर्चा बऱ्याचदा होते, पण त्याचं आऊटपुट काय? अशा चर्चांना कंटाळून आम्ही ५ जण एकत्र आलो आणि मराठी प्रेक्षकांसाठी हक्काचा ओटीटी प्लॅटफॉर्म हवा असा विचार करू लागलो. सध्या त्याचं काम वेगाने पुढे सरकत आहे. २०२० या वर्षानं आपल्याला विचार करायला भाग पाडलं. संकटामुळे आपण थांबलो आणि विचार करायला वेळ मिळाला. कोणतंही संकट एक नवीन संधी घेऊन येतं असं म्हणतात. अनेकांनी या काळात त्यांचे व्यवसाय बदलून बघितले, कामाची पद्धत बदलून बघितली. स्वतःला बदलण्यासाठीचा वेळ २०२० या वर्षानं दिला. एका आगामी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्याची संधी मला मिळाली. लॉकडाउनच्या काळात बँक बॅलन्सला लागलेले धक्के लक्षात घेत ही सुवर्ण संधी समोर आली. बऱ्याचदा काहीच बदलत नाही, म्हणून सुद्धा काही बदल होत नाही. उदाहरण सांगायचं तर, आपण ट्रेकिंगला जाताना, दरवेळी एकाच मार्गाने जात राहिलो, तर बाकी रस्त्यांचं सौंदर्य आपल्याला कळत नाही. तसं काहीसं होतं. नेमकं याच आपल्या रुटीनला छेद देणारं हे वर्ष ठरलं. २०२१ आता अगदी काही तासांवर आहे. येणाऱ्या वर्षाच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा. २०२१ आपल्यासाठी काय घेऊन येईल याचा अंदाज नाही. पण नवीन वर्षात नवीन संकट आलं तरी त्याला धैर्यानं सामोरं जाण्याची ताकद २०२० नं आपल्याला दिली आहे. २०२१ मध्ये मी वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्या भेटीला येत आहेच. २०२० ने मला संधी दिली २०२१ पासूनचं माझं आयुष्य बदलण्याची. एक मोठा धडा दिला की सोशल मीडियावर फार विसंबून राहायचं नाही. अनुभवातून शहाण व्हायचं, फॉरवर्डेड मेसेजेस मधून नाही. आपली काळजी आता आपणच घ्यायला हवी. सरकार यंत्रणा तेव्हाच मदत करू शकते जेव्हा आपण शहाण्यासारखे वागायला लागू. २०२० हे वर्ष खऱ्या अर्थाने जाणिवेचं होतं, क्षमता ओळखण्याचं होतं, माणुसकी जपण्याचं होत आणि म्हणूनच २०२० जगासाठी होतं एक टर्निंट पाँइंट ! 0
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2WWX4bh
No comments:
Post a Comment