म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई अभिनेता आणि यांच्यातील इमेल वाद प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकाने (सीआययू) शनिवारी पुन्हा एकदा हृतिकचा जबाब नोंदवला. २०१६ नंतर थांबलेला तपास पुन्हा सुरू करून हृतिकचा जबाब घेण्यात आल्याने याप्रकरणात कंगनालाही चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. तपास, पुरावे तसेच इतर कायदेशीर बाबींचा अभ्यास करून लवकरच कंगनाला यासाठी बोलाविले जाईल, असे गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. कंगना रणोट हिने हृतिकने आपल्याला काही खासगी आणि रोमॅन्टिक ई-मेल पाठवल्याचा आरोप केल्याने दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली होती. कंगनाने मला हजारो मेल पाठविल्याचा आरोप करीत हृतिकने पोलिसांत तक्रार केली होती. त्याच्या तक्रारीवरून २०१६ मध्ये वांद्रे-कुर्ला संकुल येथील सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर याप्रकरणात कंगनाची चौकशीही करण्यात आली होती. मात्र, तपास फार पुढे चालला नाही. तपासाकरिता हृतिकने मोबाइल, लॅपटॉप तसेच इतर साहित्य पोलिसांना दिले होते. चार वर्षांनंतरही या गुन्ह्याचा तपास जैसे थेच आहे. हृतिकच्या वकिलांच्या मागणीनंतर पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी डिसेंबर २०२० मध्ये तपास पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्या सीआययू पथकाकडे सोपवला होता. सीआययूने बुधवारी जबाब नोंदविण्यासाठी हृतिकला समन्स पाठिवले होते. सायबरतज्ज्ञांच्या मदतीने २०१४ मध्ये कंगनाच्या दोन मेल आयडीवरून पाठविण्यात आलेले सुमारे साडेनऊशे इमेल तपासण्यात आले. यापैकी सुमारे ३५० ईमेलमध्ये आक्षेपार्ह भाषा, अश्लील छायाचित्रे, तसेच इतर अनेक बाबींचा समावेश आहे. याबाबत अधिक माहिती आणि सविस्तर जबाब देण्यासाठी शनिवारी सकाळी ११च्या सुमारास हृतिक क्रॉफर्ड मार्केट येथील आयुक्त कार्यालयात दाखल झाला. सुमारे दोन तास हृतिकचा जबाब घेण्यात आला. गुन्हा दाखल करताना दिलेली माहिती यावेळी पुन्हा हृतिकने दिली असून, काही संदर्भही दिल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2ZTUch0
No comments:
Post a Comment