मुंबई : भांडवली बाजारात आज तेजीची लाट धडकली आहे. आज मंगळवारी शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी चौफेर खरेदीचा सपाटा लावला. ज्यात मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ८०० अंकांनी उसळला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २५० अंकांनी वधारला आहे. याआधी शुक्रवारी सेन्सेक्सने ५६८ अंकांची कमाई केली होती. तो ४९००८ अंकांवर स्थिरावला होता. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १८२ अंकांनी वधारून १४५०७ अंकावर बंद झाला होता. काल सोमवारी होळी निमित्त भांडवली बाजार बंद होते. आज सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्सने ४५० अंकांची झेप घेतली. मुंबई शेअर बाजारातील ३० पैकी २६ शेअर तेजीत वधारले. ज्यात एचयूएल, टायटन, ओएनजीसी, एसबीआय, एचडीएफसी, एशियन पेंट, एचसीएल टेक, आयटीसी, इन्फोसिस, ऍक्सिस बँक या शेअरचा समावेश आहे. तर टीसीएस, मारुती, बजाज ऑटो आणि महिंद्रा अँड महिंद्रा या शेअरमध्ये घसरण झाली आहे. आज नझारा टेक या कंपनीच्या शेअरने दणक्यात भांडवली बाजारात एंट्री घेतली. नझारा टेकचा शेअर इश्यू प्राईसपेक्षा ८१ टक्के जादा दराने शेअर बाजारात सूचीबद्ध झाला. नावाजलेले गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांची नझारा टेकमध्ये हिस्सेदारी आहे. आजच्या दमदार नोंदणीने झुनझुनवाला यांची हिस्सेदारीचे मूल्य ६५६ कोटींनी वाढले. मागील दोन सत्रात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी बाजारातील विक्रीचे प्रमाण कमी केले आहे. त्यातुलनेत स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी खरेदीचा ओघ सुरु केल्याने बाजारात तेजी परतली सलूनचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हसेसचे शेअर बाजार विश्लेषक डॉ. व्ही. के विजयकुमार यांनी सांगितले. मात्र दुसऱ्या बाजुला देशात करोना रुग्णांची वाढली संख्या, यूएस बॉण्ड यिल्डमध्ये झालेली वाढ आणि आर्थिक वर्षाची अखेर या घटकांचा बाजारावर परिणाम होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. सध्या मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ८३७ अंकांनी वधारला आहे. तो ४९८४५ अंकावर आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २४६ अंकांनी वधारून १४७५३ अंकावर ट्रेड करत आहे. या तेजीत गुंतवणूकदारांच्या मालमत्तेत किमान दीड लाख कोटींची भर पडली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/39pX9Ln
No comments:
Post a Comment