म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई येथील ड्रीम्स मॉलला लागलेल्या भीषण आगीमुळे मुंबईतील सर्वच रुग्णालयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे महापालिकेने या मॉलमधील सनराइज रुग्णालयाला आरोग्य व अग्निशमन दलाने दिलेले सर्व परवाने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे या रुग्णालयाच्या कोणत्याही परवान्यांचे नूतनीकरण केले जाणार नाही, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. या आगीत सनराइज रुग्णालयातील ११ रुग्णांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला होता. मॉलमध्ये रुग्णालयाला परवानगी दिल्याबद्दल पालिका आणि अग्निशमन दलावर सध्या टीकेची झोड उठली आहे. त्यानंतर प्रशासनाने मुंबईतील सर्व रुग्णालये, नर्सिंग होम आणि मॉलबाबत कारवाईची कठोर पावले उचलली आहेत. या सर्वांचे पुन्हा 'फायर ऑडिट' करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ११०९ रुग्णालये, नर्सिंग होम आणि ७१ मॉलचा समावेश आहे. सनराइज रुग्णालयाला महाराष्ट्र नर्सिंग होम कायद्यानुसार पालिकेच्या विक्रोळी एस विभागातील आरोग्य यंत्रणेने नोंदणी प्रमाणपत्र तसेच अग्निशमन दलाने ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. या प्रमाणपत्रांची मुदत आज ३१ मार्च रोजी संपत आहे. याबाबत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी रुग्णालयाचे सर्व प्रकारचे परवाने रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. तसेच, जुन्या परवान्यांचे यापुढे नूतनीकरण केले जाणार नाही, असेही स्पष्ट केले. नियम धुडकावले दरम्यान पालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाचे (पूर्व उपनगर) प्रमुख अभियंता एन. आर. खानोलकर यांनी तत्कालीन पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांना या रुग्णालयाच्या ''ओसी''बाबत वस्तूनिष्ठ अहवाल सादर केला होता. त्यातील अवैध बांधकामाचा मुद्दा आणि ओसी मिळवण्याचे नियम बाजूला ठेऊन परदेशी यांनी ''ओसी'' दिली. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2QQxZip
No comments:
Post a Comment