म. टा. विशेष प्रतिनिधी, रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे करोना केंद्रांतील खाटा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे नवीन केंद्र उभारणीचे प्रयत्न सुरू असतानाच अंधेरीत सकारात्मक अनुभव महापालिकेला आला आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंगच्या संचालकाने आपला राहता बंगला आणि इन्स्टिट्यूटचे मुलामुलींचे हॉस्टेल करोना केंद्रासाठी उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे पालिकेला तब्बल २०० खाटांचे येथे उभारणे शक्य झाले आहे. मुंबईतील इतर भागांप्रमाणेच अंधेरी पूर्व परिसरातही करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. पालिकेची रुग्णालये, सेव्हन हिल रुग्णालये, करोना केंद्र तसेच हॉस्टेलांमध्ये रुग्णांची व्यवस्था केल्यानंतरही आणखी जागेची गरज भासत आहे. या पार्श्वभूमीवर जागांच्या शोधात असताना अंधेरी एमआयडीसी परिसरात केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंगकडे पालिकेने जागा देण्याची विनंती केली. इन्स्टिट्यूटचे संचालक तन्वीर आलम यांनी कोणतेही आढेवेढे न घेता दुसऱ्या क्षणी जागा देण्याचे मान्य केले. एमआयडीसीतील हा भाग झाडाझुडपांनी वेढलेला असून अतिशय रम्य परिसर म्हणून ओळखला जातो. इन्स्टिट्यूटच्या आवारात मुलामुलींची प्रत्येकी पाच मजली दोन स्वतंत्र हॉस्टेलच्या इमारती असून लॉकडाउनमुळे सध्या त्याचा वापर होत नाही. या हॉस्टेल इमारतींचे तसेच संचालकांच्या बंगल्याचे करोना केंद्रात रूपांतर करण्यात आले आहे. संचालकांकडे आम्ही हॉस्टेलच्या इमारतींविषयी विचारणा केली होती. त्यांनी आपला राहता बंगला देखील देण्याची तयारी दाखवून आम्हाला आश्चर्याचा धक्का दिला. या केंद्रामुळे अंधेरी परिसरातील रुग्णांची व्यवस्था करता येईल, अशी माहिती पालिकेच्या अंधेरी के पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी दिली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3tRnLNx
No comments:
Post a Comment