म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई एकीकडे करोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे चारकोपमधील लॅब टेक्निशियनने तब्बल ३७ जणांना दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत टेक्निशियनचा गैरप्रकार उघड झाला असून चारकोप पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मोहम्मद सलीम उमर (२९) असे त्याचे नाव आहे. चारकोपमध्ये राहणाऱ्या चारू चौहान यांनी एका नामांकित लॅबमध्ये तपासणीसाठी आपले स्वॅब दिले. दोन दिवसांनी त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. अंगात लक्षणे असतानाही रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना संशय आला. त्यांनी याबाबत कुणालाही न सांगता थेट चारकोप पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार केली. प्रकरण गंभीर असल्याने वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोहर शिंदे यांनी स्वतः या प्रकरणाची दखल घेतली. तपासादरम्यान करोना चाचण्या आणि त्यांचे रिपोर्ट देण्याची जबाबदारी मोहम्मद सलीम उमर याच्याकडे असल्याचे समजले. पोलिसांनी उमर याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले. सारे काही संशयास्पद वाटत असल्याने पोलिसांनी उमरला ताब्यात घेतले आणि त्याची कसून चौकशी केली. त्यावेळी चारू यांचे स्वॅब तपासणीकरिता मुख्य लॅबमध्ये पाठविलेच नसल्याचे त्याने सांगितले. पूर्वी आलेल्या रिपोर्टमध्ये अॅपच्या सहाय्याने एडिट करून चारू यांचे नाव टाकून त्यांना रिपोर्ट दिल्याचे तो म्हणाला. पोलिसांनी त्याच्याकडे आणखी खोलवर चौकशी केली असता सुमारे ३७ जणांना अशाप्रकारे खोटे रिपोर्ट दिल्याचे त्याने कबूल केले. हे ३७ कोण? ते खरेच आजारी आहेत का? खोटे रिपोर्ट दिलेल्यांची संख्या यापेक्षा अधिक आहे का? हे तपासातून स्पष्ट होईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/329fQ1T
No comments:
Post a Comment