म. टा. विशेष प्रतिनिधी, संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमध्ये लागण होण्याचे प्रमाण ३१ ते ४० वयोगटामध्ये सर्वाधिक दिसून आले आहे. राज्यासह मुंबईमध्येही हेच चित्र दिसत आहे. संसर्गाचे प्रमाण या वयोगटामध्ये २१.५३ टक्के असून त्याखालोखाल ४१ ते ५० या वयोगटामध्ये हे प्रमाण १८.१० टक्के इतके दिसून आले आहे. करोना संसर्गाच्या पहिल्या लाटेमध्ये पन्नास ते साठ या वयोगटातील व्यक्तींमध्ये संसर्गाचे प्रमाण अधिक होते. अनलॉकनंतर कामानिमित्त तसेच शैक्षणिक कारणांसाठी बाहेर जाणाऱ्या तरुणांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे करोना संसर्ग झालेल्या तरुण रुग्णसंख्येचे प्रमाण अधिक दिसून येते. यातही सहआजार असलेल्या तरुणांचे प्रमाण जास्त आहे, तसेच वैद्यकीय उपचारासाठी तरुण खूपच विलंबाने जात असल्याचे दिसून येत आहे. वाचा: ३१ ते ४० या वयोगटामध्ये राज्यातील ७ लाख १२ हजार २१५ व्यक्तींना संसर्ग झाला असून ४१ ते ५० या वयोगटामध्ये ५ लाख ९७ हजार ९७७ व्यक्ती बाधित झाल्या आहेत. २१ ते ३० या वयोगटामध्येही संसर्गाचे प्रमाण अधिक असून या गटातील ५ लाख ५७ हजार ९१४ जणांना करोनाची लागण झाली आहे. हे प्रमाण टक्केवारीमध्ये १६.८५ टक्के इतके नोंदवण्यात आले आहे. त्या खालोखाल ५१ ते ६० या वयोगटातील १५.८८ टक्के म्हणजे ५,२२,८८५ व्यक्तींना करोना संसर्गाची लागण झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. कामानिमित्त बाहेर जाणाऱ्यांकडून संसर्गाची लागण ज्येष्ठ नागरिकांनाही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यात ३३ लाख ७३२ जणांना करोना संसर्गाची लागण झाली असून ७१ ते ८० या वयोगटामध्ये करोनाची लागण होण्याचे प्रमाण पहिल्या लाटेच्या तुलनेत अतिशय कमी म्हणजे ५.२७ टक्के इतके नोंदवण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिकांमध्ये करोना संसर्गाचे प्रमाण कमी होण्याचे मुख्य कारण लसीकरण असू शकते, या शक्यतेकडे संसर्गजन्य आजाराचे तज्ज्ञ डॉ. अंकुश मोहिते यांनी लक्ष वेधले. राज्यातील ६१ टक्के पुरुष, तर ३९ टक्के स्त्रियांना करोनाची लागण झाली आहे. स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये हे प्रमाण अधिक असल्याचे दिसते. करोना संसर्गासाठी केलेल्या एकूण चाचण्यांमध्ये १७ टक्के चाचण्या पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. काय सांगतात मुंबईतील आकडे? मुंबईमध्ये ३० ते ३९ या वयोगटातील ९२,७५६ जणांना करोनासंसर्ग झाल्याचे दिसून येते. यात पुरुषांचे प्रमाण ६४ टक्के, तर स्त्रियांचे प्रमाण ३६ टक्के नोंदवण्यात आले आहे. ५० ते ५९ या वयोगटामध्ये संसर्गाचे प्रमाण ९० हजार १५५ इतके असून त्यात पुरुषांचे प्रमाण ६२ टक्के, तर स्त्रियांचे प्रमाण ३८ टक्के आहे. ४० ते ४९ या वयोगटातील ८७ हजार ७४० जणांना करोनासंसर्ग झाल्याची नोंद पालिकेने १० एप्रिलच्या अहवालामध्ये केली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3g41fN9
No comments:
Post a Comment