: राज्य सरकारने करोना चाचणीच्या दर कपात केली असली, तरी एका चाचणीचे दर अद्यापही नियंत्रणाबाहेर आहेत. त्यासाठी नागरिकांना तब्बल ४,५०० रुपये मोजावे लागत आहेत. राज्यात दोन विमानतळांसह काही पॅथॉलॉजी लॅबमध्ये ही महागडी चाचणी अद्यापही होत आहे. राज्य सरकारने ३१ मार्चला करोनाचाचणीचे कमाल दर निश्चित केले. त्यानुसार आरटी-पीसीआर चाचणीसाठी तीन वेगवेगळ्या चाचणीचे ५०० ते ८०० रुपये असे दर आहेत. तर रॅपिड अँटिजेनसाठी १५० ते ३०० रुपये, असे कमाल दर निश्चित करण्यात आले आहेत. परंतु, या दोन चाचण्यांखेरीज तिसरी चाचणीदेखील असून ती राज्य सरकारकडून दुर्लक्षित राहिली आहे. आरटी-पीसीआरमध्येच 'मोलेक्यूल' प्रकारची एक चाचणी सध्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ व नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबडेकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर, तसेच राज्यातील अन्य काही पॅथॉलॉजी लॅबमध्ये होत आहे. या चाचणीत फक्त जेमतेम १३ मिनिटांत निकाल येतो. पण, तिचा दर तब्बल ४,५०० रुपये आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने कुठलीही पावले उचललेली नाहीत. ३१ मार्चच्या आदेशात या चाचणीचा साधा उल्लेखदेखील राज्याच्या आरोग्य विभागाने केलेला नाही. 'आयडी नाऊ' नावाची ही चाचणी अमेरिकेच्या 'अबॉट' कंपनीकडून केली जाते. अमेरिकेसह पोर्तोरिको, मेक्सिको व मध्य अमेरिकेत अनेक ठिकाणी होते. महाराष्ट्रातील निवडक ठिकाणांसह मनीपाल, मॅक्स, अस्टर, बीएम बिर्ला व अपोलो समुहांच्या कोलकाता, बेंगळुरू व भुवनेश्वर येथील रुग्णालयांत ही चाचणी होत आहे. तसेच राज्याबाहेर हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई व कोलकाता येथील विमानतळांवरही ही चाचणी होत आहे. पॅथॉलॉजी लॅबबाबत लपवाछपवी राज्यात मुंबई व नागपूर विमानतळांखेरीज अन्य काही पॅथॉलॉजी लॅबमध्ये ही चाचणी होते. पण, या प्रयोगशाळा नेमक्या कुठल्या याबाबत 'अबॉट' कंपनीकडून लपवा-छपवी आहे. 'महाराष्ट्र टाइम्स'ने यासंबंधी 'अबॉट' कंपनीकडे ई-मेलद्वारे विचारणा केली असता, कंपनीच्या अधिकारी कृष्णा भारद्वाज यांनी संपर्क साधला. त्यांनीही मुंबई, नागपूर विमानतळांशिवाय काही प्रयोगशाळांमध्ये ही चाचणी होत असल्याचे मान्य केले. पण त्या प्रयोगशाळा कोणत्या, याबाबतची माहिती देण्यास टाळाटाळ केली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3fZFazq
No comments:
Post a Comment