म. टा. प्रतिनिधी, मुंबई परदेशामध्ये राहताना आपल्या भाषेतील साहित्य, संपर्क हा हळुहळू कमी होतो. याचा परिणाम अर्थातच पुढच्या पिढ्यांवरही होतो. अशा परदेशात स्थायिक झालेल्या मराठी भाषकांचे मराठीशी नाते जपावे, यासाठी यंदा दिनाच्या निमित्ताने मराठी भाषा विभागातर्फे प्रयत्न करण्यात आला. राज्य मराठी विकास संस्थेच्या माध्यमातून २७ फेब्रुवारी ते २७ एप्रिल या कालावधीमध्ये आंतरराष्ट्रीय मराठी भाषा प्रचार-प्रसार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मराठीतून अभिव्यक्तीसाठी ३५ देशांमधील मराठीजनांनी उत्साही प्रतिसाद नोंदवला. आंतरराष्ट्रीय मराठी प्रचार व प्रसार ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आयोजित केली गेलेली स्पर्धा होती. परदेशस्थ मराठीजनांना मराठी भाषा विभागाशी जोडण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले, अशी माहिती राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय पाटील यांनी दिली. केवळ मराठीच नाही तर अमराठी भाषकांचेही यामध्ये स्वागत करण्यात आले. यंदाचा हा पहिलाच पथदर्शी प्रकल्प होता, असेही ते म्हणाले. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, तसेच ई- मेल आणि व्हॉट्सअॅपद्वारे लोकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. यामध्ये अगदी ७० वर्षांच्या पुढील व्यक्तीही सहभागी झाल्या होत्या. परदेशातील महाराष्ट्र मंडळांपर्यंत या स्पर्धेची माहिती पोहचवण्यात आली. त्यातून महाराष्ट्र मंडळांशी जोडलेल्या अनेक संस्थांपर्यंत आणि व्यक्तींपर्यंत ही स्पर्धा पोहोचली, अशी माहिती आंतरराष्ट्रीय जागतिक मंचाचे सरकारनियुक्त समन्वयक अभिषेक सूर्यवंशी यांनी दिली. एकूण ३५ देशांमधील एक हजार २४५ अनिवासी भारतीयांपर्यंत ही स्पर्धा पोहोचली. त्यातून ११८ जणांनी प्रत्यक्ष व्हिडीओ, लेख अशा माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या. या स्पर्धेमध्ये जर्मनीचे ऋषिकेश आपटे, दक्षिण कोरियास्थित प्रविणा बागल, सिंगापूर येथील नंदकुमार देशपांडे आणि अमेरिकेतील विद्या हर्डीकर सप्रे यांना १ मे रोजी विशेष प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात येणार आहे. अमराठींचाही सहभाग काही अमराठी भाषकांनीही यामध्ये सहभाग नोंदवला. जेम्स सिम्पसन आणि जेन वोल्कोव्ह या अमराठी भाषकांचा या उपक्रमामध्ये विशेष सहभाग होता.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3eM5meC
No comments:
Post a Comment