म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई वाढत्या करोनाची संसर्गाची भीती आणि त्यामुळे लॉकडाउनची शक्यता यामुळे नैराश्य आणि भविष्याच्या चिंतेने अनेकांना ग्रासले आहे. या दुष्टचक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळत नसल्याने सुरुवातीच्या विरोधानंतर आलेली असहायताही लोकांमध्ये दिसू लागली आहे. सरकारपासून सगळ्याच यंत्रणांविरुद्ध रागाची जाणीवही अनेक लोकांमध्ये दिसत असल्याचे मानसोपचारतज्ज्ञांचे निरीक्षण आहे. करोना आणि लॉकडाउनमुळे निर्माण होणाऱ्या अनिश्चिततेमुळे अनेकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाल्याचे गेल्या वर्षभरात समोर आले आहे. अनेक व्यक्तींमध्ये दिसत असल्याने मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी यांनी सांगितले. सध्या कुटुंबीयांचा व असेल त्या संस्थेचा आधार महत्त्वाचा आहे. आपले या संस्था, कुटुंबाशी नाते आहे याची जाणीव असणे महत्त्वाचे आहे. मात्र सध्या अनेकांना भविष्याची खात्री वाटत नसल्याने हे नैराश्य जाणवत असल्याचे दिसते. काही जण आजचा दिवस नीट गेला, उद्या चांगले किंवा वाईट होऊ शकते याची जाणीव बाळगून आहेत. आपण काळजी घेऊ, मात्र काही नकारात्मक घडले तर त्याला तोंड देऊ असा विचार करून वावरत आहेत. तर काही जण आज आनंद घेऊ या, उद्याचा दिवस कोणी पाहिला आहे या बेफिकीरीनेही जगत आहेत. करोनाकाळामध्ये हे सगळे पडसाद उमटले आहेत. मात्र सध्या मास्क वापरण्यासारखी काही प्राथमिक काळजी घेणे गरजेचे आहे. अवास्तव पैसे खर्च न करणे, भविष्यात पैशांची गरज भासू शकते याची जाणीव बाळगणे, आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. या साध्या उपाययोजनांनीही मदत होऊ शकते, असेही डॉ. शेट्टी यांनी स्पष्ट केले. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनीही लहान उद्योजक, नोकरदार यांच्यामध्ये पुन्हा नैराश्य जाणवत असल्याचे सांगितले. ज्यांची बचत फारशी नाही त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे. आता करोना झाला तरी चालेल मात्र पैसे कमावणे आवश्यक आहे, असाही विचार रुजू लागला आहे. यात विरोधाची भावना तीव्र आहे. वर्षभरापासून जे घरात आहेत, त्यांच्यामध्ये अत्यंत नकारात्मक विचार रुजलेले आहेत. घरात बसून चिडचिड वाढू लागली आहे. घरातील वादांमुळे निराशाही येत आहे. व्यवसाय न चालणे, आधीची जीवनशैली अनुभवायला मिळत नसल्याने नैराश्य वाढत आहे. नोकरी टिकेल का, करोना राहाणार का, पुढचे जीवन कसे जगू असे प्रश्न सतत डोक्यात सुरू असल्याने भविष्याबद्दलचे दडपण वाढत आहे, असे डॉ. मुंदडा म्हणाले. समुपदेशनाचा उपाय यातून बाहेर पडण्यासाठी समुपदेशनाचा उपाय आहे. समुपदेशनानेही नैराश्य नियंत्रणात येत नसल्यास त्यांच्यासाठी औषधोपचारांचा पर्याय आहे. लॉकडाउनच्या आधी येणारे रुग्ण आणि सध्याचे रुग्ण यांच्यामध्ये सुमारे २५ टक्क्यांची वाढ झाली आहे. यामध्येही नैराश्य जाणवणारे मात्र वैद्यकीय उपचारांची मदत न घेणाऱ्या रुग्णांची आकडेवारी मोठी असल्याचे, डॉ. मुंदडा यांनी सांगितले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3ughAlM
No comments:
Post a Comment