म. टा. प्रतिनिधी, वानवडी येथील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयातील (एएफएमसी) ब्रिगेडियर अनंत नाईक यांनी पुणे रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर उद्यान एक्स्प्रेस खाली उडी मारून आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारी घडली. नाईक यांच्याकडे हॉस्पिटल प्रशासनाची जबाबदारी होती. नाईक भुवनेश्वर येथील रहिवासी होते. ते एएफएमसी येथे कार्यरत होते. रविवारी सकाळी ते सरकारी गाडीतून चालकासोबत पुणे रेल्वे स्टेशन येथे आले होते. 'मी रेल्वे स्थानकातील एमसीओमध्ये (मूव्हमेंट कंट्रोल ऑफिस) जाऊन येतो,' असे चालकाला सांगून नाईक यांनी रेल्वे स्थानकात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास उद्यान एक्सप्रेस गाडीच्या इंजिन पुढे उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना प्लॅटफॉर्म क्रमांक तीन येथे घडली, अशी माहिती पुणे लोहमार्ग पोलिसांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांनी प्लॅटफॉर्म तीनकडे धाव घेतली. नाईक यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे सुसाइड नोट आढळली नाही. नाईक यांच्या आत्महत्येची माहिती त्यांच्या मुलाला फोनद्वारे कळवण्यात आली. त्यांचा मुलगा आज, सोमवारी पुण्यात येत असून तो आल्यानंतरच त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करावे, अशी विनंती मुलाने केली आहे. या घटनेनंतर लोहमार्ग पोलिस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी आणि 'एएफएमसी'ला भेट दिली. प्लॅटफॉर्म एकवरही आत्महत्येचा प्रयत्न 'रेल्वे स्थानकात संतोष कांबळे या विक्रेत्याने अनंत नाईक यांना आत्महत्या करताना पाहिले. स्थानकातील सीसीटीव्ही फूटेज तपासले असता, नाईक प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर फिरत होते. त्यानंतर तेथेही त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे दिसून आले,' अशी माहिती पुणे लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुरेशसिंग गौड यांनी दिली. अनंत नाईक यांनी प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर आत्महत्येचा पहिला प्रयत्न केल्याचे सीसीटीव्ही फूटेजमध्ये आढळले आहे. त्यांनी आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली, त्याचा तपास सुरू आहे. - सुरेशसिंग गौड, वरिष्ठ निरीक्षक, पुणे लोहमार्ग पोलिस ठाणे
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3gns0fQ
No comments:
Post a Comment