Breaking

Wednesday, April 14, 2021

आता ठरणार राज्याचा साप, कोळी https://ift.tt/3wPLsaO

म. टा. प्रतिनिधी, पुणे राज्य फुलपाखरापाठोपाठ लवकरच राज्याचा साप आणि राज्याचा कोळी निश्चित होणार आहे. कीटक प्रजातीचे संवर्धन आणि सापांबद्दलचे गैरसमज दूर करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने मानचिन्ह ठरविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे. राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत निसर्ग मानचिन्हांबद्दल चर्चा झाली होती. यासाठी राज्य सरकारने तज्ज्ञांची समिती नेमली असून, यात अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये, मुख्य वनसंरक्षक रवींद्र वानखेडे, डॉ. रविकिरण गोवेकर, रमेश कुमार, डॉ. वरद गिरी यांसह प्राणिशास्त्रातील तज्ज्ञ आणि कीटकशास्त्रातील तज्ज्ञांचा समावेश आहे. पुण्यातील नव वनभवनात नुकतीच या संदर्भात पहिली बैठक झाली. 'निसर्गमानक निश्चित करताना पहिल्यांदा घटकांची प्राथमिक यादी निश्चित करण्यात येणार आहे. निवडलेल्या प्रजातींची वैशिष्ट्ये, निसर्ग साखळीतील भूमिका, परिसंस्थेतील महत्त्व, संबंधित प्रजातीची उपलब्धता, धोकाग्रस्त, प्रदेशनिष्ठ असा सर्व मुद्द्यांचा विचार करण्यात येईल. लोकसहभागातून निसर्ग संवर्धनाला चालना देण्याच्या उद्देशाने ही निसर्गमानके निश्चित करण्यात येणार आहेत,' अशी माहिती लिमये यांनी दिली. राज्याचे फुलपाखरू निश्चित करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले होते. त्यानंतर इतर राज्यांनी उपक्रमांचे अनुकरण केले. राज्याचा सर्प, कोळी आणि इतर मानचिन्हे अद्याप इतर राज्यांनी कोणी निश्चित केलेली नाहीत. राज्यात गैरसमजातून दर वर्षी सापांची मोठ्या प्रमाणात हत्या केली जाते. उपचारांच्या अज्ञानातूनही दर वर्षी सर्पदंशाने लोकांचा मृत्यू होतो. राज्य सर्प निश्चित झाल्यास सापांबद्दल जनजागृती करण्याच्या चळवळीला चालना मिळेल. निसर्गात केवळ मोठे प्राणी महत्त्वाचे नसून, निसर्गातील प्रत्येक घटक महत्त्वाचा असल्याचा संदेश या उपक्रमातून लोकांपर्यंत जाणार आहे, असे मत समितीतील सदस्यांनी व्यक्त केले. समिती काय करणार? - राज्यात किती निसर्ग मानचिन्हे असावीत, त्यांचे निकष ठरवणार - राज्य कोळी निवडीपूर्वी संबंधित प्रजातीचे परिसंस्थेतील महत्त्व आणि मूल्यमापन - राज्य सर्प निवडीपूर्वी परिसंस्थेतील महत्त्व, गुणधर्म, वैशिष्ट्यांचे मूल्यमापन - निकषात बसणाऱ्या प्रजातींचा निकषांनुसार अंतिम अहवाल राज्याची चिन्हे राज्य पुष्प - ताम्हण राज्य वृक्ष - आंबा राज्याचे मानचिन्ह - शेकरू राज्य पक्षी - हरियाल पक्षी राज्य फुलपाखरू - ब्लू मॉरमॉन


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2QnV77N

No comments:

Post a Comment