वृत्तसंस्था, नवी दिल्ली 'मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये लशीचे अतिरिक्त डोस उपलब्ध करण्यात येणार असून, महिन्यात १२ कोटी डोस उपलब्ध होतील,' अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी दिली. विविध राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना मेमध्ये एकूण ७.९४ कोटी डोसचे वाटप करण्यात आले होते. राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना आरोग्य सेवेतील कर्मचारी, आघाडीवरील कर्मचारी व ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींसाठी जूनमध्ये एकूण ६.०९ कोटी लशी देण्यात येणार आहेत. याशिवाय देशभरातील खासगी रुग्णालयांना जूनमध्ये ५.८६ कोटी लशी थेट विकत घेता येतील. यानुसार पुढील महिन्यात एकूण सुमारे १२ कोटी लशीचे डोस उपलब्ध होतील, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. या लशींच्या वाटपाच्या कार्यक्रमाबाबत राज्यांना वेळीच माहिती दिली जाणार आहे. आपल्या वाट्याला आलेल्या लशी विनाकारण वाया जाऊ नयेत, यासाठी राज्य सरकारांनी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य निर्देश द्यावेत, अशी विनंतीही करण्यात येणार आहे, असे आरोग्य मंत्रालयातर्फे सांगण्यात आले. राज्यांच्या लसीकरणाचा वेग, लोकसंख्या व लशी वाया जाण्याचे प्रमाण या निकषावर लसवाटप केले जाणार आहे. 'जून महिन्यात कोव्हिशील्डचे दहा कोटी डोस' जून महिन्यात कोव्हिशील्ड लशीचे दहा कोटी डोस वितरित करता येतील, असे ''ने केंद्र सरकारला सांगितले आहे. अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली. 'सीरम'ने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना नुकतेच पत्र लिहिले. 'सीरम'मधील सरकारी आणि नियमन विभागाचे संचालक प्रकाशकुमार सिंह यांनी हे पत्र लिहिले आहे. आत्मनिर्भरतेकडे वाटचालीसाठी सातत्यपूर्ण पाठिंबा आणि मार्गदर्शनासाठी सिंह यांनी शहा यांचे अभिनंदनही केले आहे. 'देशातील नागरिकांचे आणि एकूणच जगाचे 'कोव्हिड-१९'पासून संरक्षण करण्यासाठी 'सीरम' कटिबद्ध आहे. सीईओ आदर पूनावाला यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या बरोबर आम्ही खांद्याला खांदा लावून लढत आहोत. सरकारच्या सहकार्याने आणि तुमच्या मार्गदर्शनाने येत्या महिन्यांत आम्ही कंपनीची लशींची उत्पादनक्षमता नक्की वाढवू. लशीच्या उत्पादनासाठी 'सीरम'चे कर्मचारी दिवस-रात्र काम करीत आहेत,' असे 'सीरम'ने लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3fUNrD6
No comments:
Post a Comment