Breaking

Friday, May 7, 2021

जीवघेण्या करोनात सर्वसामान्यांची लूट, रुग्णालयात रेमडेसिवीरचा काळाबाजार उघड https://ift.tt/2RECoFx

बुलडाणा : करोनाचा भीषण हाहाकार पसरला असताना आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याचं समोर आलं आहे. बुलडाण्यात पुन्हा एकदा रेमडेसिवीरचा काळाबाजार उघड झाला आहे. याआधीही यासंबंधी अनेक प्रकरणं समोर आली आहे. करोनाच्या गंभीर रुग्णांला उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या रेमडेसिवीर या अॅन्टी व्हायरल औषधाची मागणी आणि पुरवठा यांच्यात प्रचंड तफावत निर्माण झाल्याने औषधाचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू आहे. बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल रात्री बुलडाणा शहरातील २ हॉस्पीटलचे कर्मचारी आणि ३ आरोपींना जेरबंद केले असून त्यांच्याकडून १६ इंजेकशन ७ हजार रुपये रोख, ३ मोबाईल, २ मोटरसायकल असा एकूण २ लाख ५४ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जिल्ह्यातील दुसरी कारवाई आहे. ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरवर असलेल्या करोना रुग्णांवर रेमडेसिवीर या औषधाची चांगला परिणाम होत असल्याचं समोर आल्यानंतर त्याचा उपचारासाठी वापर वाढला आहे. सध्या १०० एमजीचे एक व्हायल दुप्पट व तिप्पट भावाने विकलं जात आहे. करोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांच्या हाती सर्रास त्या औषधाची चिट्ठी डॉक्टरांकडून दिली जात असून त्याचा गैरफायदा घेत काळाबाजार सुरू आहे. ७ मे रोजी दोन हॉस्पिटलचे काही कर्मचारी औषधांचा काळाबाजार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. बुलडाणा एलसीबीचे पीएसआय श्रीकांत जिंदमवार आणि त्यांच्या पथकाने सापळा रचून या तिघांना येळगाव फाटा आणि जांभरून रोड या दोन ठिकाणाहून जेरबंद केलं. तिघेही कर्मचारी ज्या हॉस्पिटलमध्ये काम करत होते त्या दोन्ही हॉस्पिटलला मेडिकल अटॅच आहेत. याच मेडिकलमधून रेमडेसिवीर इंजेक्शन काळ्याबाजारात विकण्याचा धंदा सुरू असल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात अधिक तपास सुरू असून आणखी रुग्णालयात असा काही प्रकार सुरू आहे का याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. इतकंच नाही तर ताब्यात घेतलेल्या आरोपींचीही कसून चौकशी करणार असून आणखी कोणाचा यामध्ये हात आहे का? याची तपास सुरू आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3xY3k3O

No comments:

Post a Comment