मुंबई : करोनाच्या जीवघेण्या संसर्गामुळे अनेक महत्त्वाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. यावरूनच आता राजकारण पेटताना दिसत आहे. करोनामुळे राष्ट्रीय लोकसेवा आयोगाने २७ जूनला होणारी नागरी सेवा प्राथमिक परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर काँग्रेस नेते भाई जगताप यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर निशाणा साधला आहे. एमपीएसी परीक्षा स्थगित केल्यानंतर गोंधळ घालणारे आता कुठे गेले? असा थेट सवाल भाई जगताप यांनी विचारला आहे. यावर त्यांनी एक ट्वीट करत ही टीका केली आहे. खरंतर, एमपीएसी परीक्षा रद्द केल्यानंतर राज्यभर अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आली आहे. त्यावर भाई जगताप यांनी भाजपला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे. भाई जगताप यांनी ट्वीटमध्ये लिहलं आहे की, 'राज्य सरकारने MPSC ची परीक्षा रद्द केली म्हणून रस्त्यावर लोळण घेऊन आंदोलन करणारे, केंद्र सरकारने UPSC ची परीक्षा रद्द केल्यावर आता हे महाराष्ट्र द्रोही कोणत्या बिळात जाऊन लपले आहेत? आता दातखिळी बसली आहे का??' अशा शब्दात जगताप यांनी गोपिचंद पडळकरांवर टीका केली आहे. दरम्यान, करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने राज्य सेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली. अवघ्या दोन दिवसांवर आलेली परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने उमेदवारांमध्ये मोठी नाराजी आहे. पुणे येथे याचाच उद्रेक पाहायला मिळाला. हे उमेदवार रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. परीक्षा रद्द केली जाऊ नये अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत येत्या रविवारी १४ मार्च २०२१ रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आलेल्या निर्देशांनंतर ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. कोविड - १९ विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे. आयोगाला राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत व पुनर्वसन विभागाकडून १० मार्च रोजी यासंदर्भातले निर्देश पत्राद्वारे कळवण्यात आले. या पत्रात असं म्हटलं होत की, राज्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांनी वेगवेगळे निर्बंध लावलेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सेवा पूर्व परीक्षा आयोजित करणे योग्य नसल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/33RAOmH
No comments:
Post a Comment