Breaking

Tuesday, May 25, 2021

होम क्वांरटाइनची अट काढल्यास गोंधळ; अधिकाऱ्यांकडून नाराजी https://ift.tt/34mAIDG

‌म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः राज्यातील करोना आकडेवारीच्या सरासरीपेक्षा अधिक रुग्ण असलेल्या जिल्ह्यांमध्ये गृहविलगकरण पूर्ण बंद करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री यांनी दिल्यानंतर त्यावर वैद्यकीय क्षेत्रासह प्रशासनातील अधिकाऱ्यांकडूनही नाराजी व्यक्त करण्यात आली. या निर्णयाच्या दोन्ही बाजूंचे परिणाम योग्य होणार नाहीत, अशी भूमिका डॉक्टरांनी व्यक्त केली. या निर्देशावर आलेल्या प्रतिक्रिया लक्षात घेता राज्यातील ज्या जिल्ह्यांचा साप्ताहिक पॉझीटिव्हीटी दर राज्य सरासरीपेक्षा जास्त आहे तिथे ग्रामीण भागात संस्थात्मक विलगीकरणावर भर देण्याच्या सूचना यंत्रणेला देण्यात आल्या आहेत, गृहविलगीकरणाची सुविधा सुरू राहील, असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. राज्यातील 'रेड झोन'मध्ये असलेल्या जिल्ह्यांमध्ये गृहविलगीकरण बंद करून बाधितांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातल्या कोविड केअर सेंटर्सची संख्या वाढवण्याचेही निर्देश देण्यात आल्याचे बैठकीनंतर आरोग्यमंत्र्यांनी सांगितले होते. त्यानंतर दिवसभर या निर्णयाविरोधात डॉक्टरांमध्ये व कोविड व्यवस्थापन करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्येही चर्चा सुरू होती. या निर्णयाचा फेरविचार करायला हवा, असे मत डॉक्टरांनी व्यक्त केले. 'आयएमए'चे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दुसऱ्या लाटेमध्ये करोनाच्या रुग्णांची संख्या उतरणीला लागली आहे. मात्र, पुन्हा ही संख्या वाढली, तर रुग्णालयांच्या एकूण व्यवस्थेवर ताण येईल. त्याचे नियोजन कसे करणार. ज्या रुग्णांमध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणे नाहीत, मात्र ते पॉझिटिव्ह आहेत. तसेच वैद्यकीय उपचारांचा खर्च करू शकतात, असे रुग्णही रुग्णालयांमध्ये दाखल होण्याचा आग्रह धरतील. मुंबईतील कष्टकरी वर्गामध्ये काम करणाऱ्या बिलाव खान यांनीही महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले. ग्रामीण भागामध्ये करोना संसर्गाचा प्रसार झाला, तरीही या समूहामध्ये लसीकरणाची तसेच चाचण्या करून घेण्याची मानसिकता अद्याप झालेली नाही. या निर्णयाप्रत येण्यासाठी त्यांना खूप वेळ द्यावा लागतो. घरे लहान असली तरीही कोविड केअर केंद्रात जाऊन दाखल होण्याची भीती त्यांच्या मनामध्ये असते. गृहविलगीकरणाची सुविधा काढून टाकली, तर या व्यक्तींकडून चाचण्या करून घेण्याचे प्रमाण कमी होईल, अशी शक्यता त्यांनी नोंदवली. त्यामुळे या दोन्ही बाजूंचा विचार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. पालिकेतील वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अमुक एकाच रुग्णालयामध्ये खाट हवी यासाठी असलेला राजकीय, तसेच वरिष्ठ पातळीवरच्या अनेकांचा आग्रह असतो. गरज नसतानाही रुग्णालयामध्ये खाटा अडवण्याचे प्रमाण वाढले, तसेच रुग्णाची संख्या वाढली, तर नियोजन कसे सांभाळायचे हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दिवसभर या निर्णयाविरोधात वेगवेगळ्या पातळ्यांवर चर्चा झाल्यानंतर संध्याकाळी गृहविलगीकरणाची सुविधा सुरू राहील, असे आरोग्यविभागाकडून घोषित करण्यात आले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3oNQ2mu

No comments:

Post a Comment