
- निर्बंधांमुळे मुंबईला ७२ हजार कोटींचा फटका - राज्यभरातील नुकसानीचा आकडा सव्वा लाख कोटींवर म. टा. प्रतिनिधी, मुंबई करोनासंबंधी निर्बंधांमुळे मुंबईभरातील व्यापाऱ्यांचे आतापर्यंत ७२ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक नुकसान मुंबईतील व्यापाऱ्यांचे झाले आहे. राज्यभरातील व्यापाऱ्यांना फटका सव्वा लाख कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळेच १ जूनपासून व्यवसायाला परवानगी द्यावी, अशी आग्रही मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. राज्य सरकारने १५ एप्रिलला करोनासंबंधी निर्बंध लागू केले. त्यादरम्यान अक्षय तृतीया हा खरेदीचा मोठा सण येऊन गेला. उन्हाळा हादेखील पर्यटनाचा काळ असल्याने कपडे, बॅगा यांची खरेदी मोठ्या प्रमाणावर होत असते. हाच लग्नसराईचाही मोसम असतो. त्यामुळे विवाहासंबंधी कपडे वगैरे खरेदीही होत असते. सध्या करोनाला आळा घालण्यासाठी लावलेल्या निर्बंधांमुळे अत्यावश्यक वगळता अन्य सर्व वस्तूंच्या विक्रीला बंदी असल्याने ही सर्व खरेदी होऊ शकली नाही. त्याचा जबर फटका व्यापारी वर्गाला बसला आहे. अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (कॅट) हा विषय उचलून धरला आहे. महासंघाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष शंकरभाई ठक्कर यांनी सांगितले की, 'मागील वर्षी लॉकडाउनमुळे व्यापार तीन ते चार महिने बंद होता. वर्षभर मंदीसदृश वातावरणच आहे. काही प्रमाणात व्यापाराला नवसंजीवनी मिळत असताना, हे दुसरे निर्बंध नव्याने आले. आधीच मागील लॉकडाउनदरम्यान १५ टक्के व्यापारी देशोधडीला लागले होते. आता मात्र दीड महिन्यांच्या निर्बंधांनंतर करोनाची लाट आटोक्यात आली आहे. त्यामुळे १ जूनपासून सर्व प्रकारच्या व्यवसायाला परवानगी मिळणे अत्यावश्यक आहे. अन्यथा व्यापारी वर्गाचे व त्यावर अवलंबून असलेल्या कर्मचाऱ्यांचे हाल होतील.' मुंबई शहर, उपनगर व महानगर क्षेत्रात जवळपास चार लाख व्यापारी आहेत. या व्यापाऱ्यांवर अवलंबून असलेल्या कर्मचाऱ्यांचा आकडा ४० लाखांच्या घरात आहे. मागील लॉकडाउनदरम्यान जवळपास पाच लाखांचा रोजगार गेला. त्यामुळे आता व्यापारावर आणखी निर्बंध नकोत, अन्यथा बेरोजगारांचा आकडा पुन्हा वाढेल. १ जूनपासून सर्व प्रकारच्या व्यवसायाला परवानगी मिळायला हवी, मागणी 'कॅट'ने केली आहे. देशाच्या १२ टक्के नुकसान 'कॅट'ने केलेल्या अभ्यासानुसार, सध्या देशात कुठे ना कुठे लॉकडाउन सदृश्य स्थिती आहे. त्यामुळे देशभरात व्यापाऱ्यांचे सुमारे १२ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यातील १२ टक्के नुकसान हे महाराष्ट्रात झाले आहे. त्यामुळेच आता निर्बंध हटविण्याची नितांत गरज त्यांनी व्यक्त केली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3wyd7Mr
No comments:
Post a Comment