Breaking

Wednesday, May 19, 2021

दिलासादायक! मुंबईतील 'या' भागांची वाटचाल करोनामुक्तीकडे https://ift.tt/3f3U5Ic

म. टा. प्रतिनिधी, मुंबईत करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात नियंत्रणात येत असताना त्यात घाटकोपर आणि मुलुंड विभाग आघाडीवर आहे. संपूर्ण मुंबईचा रुग्णवाढीचा दर ०.२७ टक्के असून मुलुंड आणि घाटकोपरचा दर ०.१९ टक्के आहे. मुंबईतील सर्वात कमी रुग्णवाढ या दोन विभागांत असून या विभागांतील रुग्ण दुपटीचा कालावधीही सर्वात जास्त म्हणजे ३७० दिवसांवर पोहोचला आहे. पूर्व उपनगरातील मुलुंड टी विभाग व घाटकोपर एन विभाग मोठ्या प्रमाणात करोनाच्या कचाट्यात सापडले होते. महिनाभरापूर्वी या विभागांमध्ये मोठ्या संख्येने रुग्ण आढळत होते. मुलुंडमध्ये रुग्ण दुपटीचा कालावधी महिनाभरापूर्वी १५० दिवसापर्यंत खाली आला होता. २० मे रोजी हा कालावधी ३७० दिवस इतका झाला आहे. घाटकोपरमध्ये रुग्ण दुपटीचा कालावधी २२० दिवस इतका होता. येथेही आता ३७० दिवसांवर पोहोचला आहे. महिनाभरापूर्वी मुलुंडमध्ये ८० ते १०० तर घाटकोपरमध्ये ५० ते ६० रुग्णांची नोंद होत होती. या संख्येत सुमारे ५० टक्क्यांनी कपात झाली आहे. या दोन विभागांखालोखाल चेंबूर एम पश्चिम विभाग असून येथे रुग्ण दुपटीचा कालावधी ३३६ दिवसांवर पोहोचला आहे. दहिसर व कुलाबा येथील रुग्ण दुपटीचा कालावधी सर्वात कमी म्हणजे अनुक्रमे १९८ व २१६ दिवस इतका आहे. मुलुंड व घाटकोपरच्या तुलनेत दहिसर व कुलाबा विभागांमध्ये करोना रुग्णवाढीचा दर अनुक्रमे ०.३५ व ०.३२ इतका आहे. वेळेत केलेल्या तपासण्या, रुग्ण शोध मोहीम, चाचण्या यामुळे या दोन विभागांत करोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यात यश आले आहे, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. चाचण्या १८ हजारांपर्यंत करोनाच्या दुसऱ्या लाटेत दररोजच्या रुग्णसंख्येने तब्बल अकरा हजारांचा टप्पा ओलांडल्याने पालिकेची चिंता वाढली होती. मात्र पालिकेने ही दुसरी लाट रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्याने रुग्णसंख्या आटोक्यात येऊ लागली आहे. सद्यस्थितीत करोना रुग्णांची दररोजची संख्या १२०० ते १५०० पर्यंत नोंदवली जात आहे. विशेष म्हणजे पालिकेने दुसऱ्या लाटेत रोजच्या चाचण्यांची संख्या दुप्पट करून ४० ते ५० हजारांपर्यंत वाढवून तसेच गेल्या काही दिवसांपासून चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात खाली आणली आहे. बुधवारी ती १८ हजारांपर्यंत आणण्यात आली. त्यानंतरही करोना संसर्ग दर २० टक्क्यांवरून आठ टक्क्यांपेक्षा कमी झाल्याने रुग्णवाढ कमी झाली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3ypwCZv

No comments:

Post a Comment