म. टा. विशेष प्रतिनिधी, जलसिंचन प्रकल्पांच्या मंजुरीवरून जलसंपदामंत्री आणि राज्याचे मुख्य सचिव यांच्यात निर्माण झालेल्या वादावर अखेर पडदा पडला. मंत्रिमंडळाने ज्या ७०जलसिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली होती, त्यांना बुधवारच्या बैठकीत अंतिम मंजुरी मिळाल्याने आता या प्रकल्पांना हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे पाटील यांची कुंटे यांच्याबाबत असलेली कथित नाराजीही संपुष्टात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत पाटील राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यावर संतापल्याची माहिती समोर आली होती. मंत्रिमंडळ बैठकीत जलसंपदा विभागाच्या प्रकल्पाबाबतचा प्रस्ताव मंजूर होऊन त्याचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले होते. असे असताना ती फाइल पुन्हा वित्त विभागाकडे पाठवल्याने पाटील यांनी जाहीरपणे मुख्य सचिवांबद्दल नाराजी व्यक्त केली होती. मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर झालेल्या जलसंपदा विभागाच्या कामांची फाइल मुख्य सचिवांनी पुन्हा एकदा वित्त विभागाकडे का पाठवली, असा प्रश्न पाटील यांनी केला होता. त्याचबरोबर मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झालेल्या गोष्टी अशा अचानक बदलत असतील तर, मंत्रिमंडळाच्या वर कुणी आहे का, असा प्रश्नही त्यांनी केला होता. मात्र त्यानंतर बुधवारी मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि जलसंपदा विभागाच्या सचिवांची बैठक झाली. त्यात ७० जलसिंचन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. त्यामुळे या प्रकल्पांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. त्यामुळे आता पाटील व कुंटे यांच्या कथित नाराजीनाट्यावर अखेर पडदा पडल्याची चर्चा आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3u5qrX7
No comments:
Post a Comment