मधुसूदन नानिवडेकर, सिंधुदुर्ग/ सुनील नलावडे, रत्नागिरी तौक्ते चक्रीवादळाने रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यांना मोठा आर्थिक तडाखा दिला आहे. गरीब मच्छिमार, शेतकऱ्यांबरोबरच आंबा बागायतदार आणि फळ उत्पादकांनाही बसला असून घरे, मच्छिमार बोटी, गोठे जमीनदोस्त झाल्याने प्रचंड हानी झाली आहे. चक्रीवादळानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याची परिस्थिती हळुहळू पूर्वपदावर येऊ लागली असून, आता नुकसानीचे आकडेही पुढे येऊ लागले आहेत. वादळामुळे आंबा, काजू, नारळ बागायतीचे अतोनात नुकसान झाले असून हा आकडा पाच कोटींच्या घरात जाण्याचा अंदाज सध्या वर्तवण्यात येत आहे. जसजसे पंचनामे होतील, तसतसे हे आकडे वाढत जाणार आहेत. सर्वाधिक फटका बसलेल्या देवगड तालुक्यामध्ये पाचशेहून अधिक घरे, गोठे व चार जिल्हा परिषद शाळांचे एकूण दीड कोटीहून अधिक नुकसान झाले आहे. तर १३२ विद्युत खांब व वाहिन्या तुटून २७ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. कलंबई केळयेवाडी तसेच विजयदुर्ग दशक्रोशीमध्येही अनेक गावांमध्ये तीन दिवस ग्राहकांना विजेविना रहावे लागले. अनेक गावांमध्ये खारबंधारा तुटून खारे पाणी शिरल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर हजारो हेक्टर शेतजमीन नापिक बनली आहे. मच्छिमारांच्या जाळ्यांचे, बोटींचेही प्रचंड नुकसान झाले आहे. वैभववाडी, कणकवली या सह्याद्रीच्या पायथ्याच्या तालुक्यातील गावांतील घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी मंगळवारी मालवणमधील वाड्यावस्त्यांना भेट देत, लवकरात लवकर नुकसानभरपाई देण्याची ग्वाही त्यांनी दिली. रत्नागिरी जिल्ह्यातही अनेक ठिकाणी शनिवारी सायंकाळी सुरू झालेल्या वादळी पावसाचे तांडव सोमवारी पहाटेपर्यंत सुरू होते. देवगड, कुणकेश्वरकडून घोंघावत आलेले वादळ आंबोळ, नाटे, जैतापूर, राजापूरकडे झेपावत असताना, घरे, झाडे, मच्छिमार नौका, घरादारांना प्रचंड फटका बसला. पाच तालुक्यांमध्ये शेकडो घरे, झाडे, विजेचे खांब तारांसह कोसळले. सोमवारी संध्याकाळी नातीला भेटायला चाललेल्या दाम्पत्याला विजेच्या तारेचा धक्का बसून प्राण गमावावे लागले. चिपळूण तालुक्यात लाखो रुपयांची हानी झाली. शेतकऱ्यांच्या बैलांचे बळी गेले. रत्नागिरीच्या मिरकरवाडा, मिऱ्या, कासारवेली, काळबादेवी, वरवडे येथील मच्छिमार नौकांचे मोठे नुकसान झाले. ठिकठिकाणी कोसळलेले वृक्ष हटवून मार्ग मोकळे करण्याचे काम मंगळवारीही सुरू राहिले. मुंबई-गोवा महामार्गावरही अनेक ठिकाणी रस्त्यावर माती वाहून आल्याने वाहनांच्या रांगा लागल्या. रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरही वाहनांच्या रांगा होत्या. तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी तालुका व ग्रामीण, शहरीभागात झालेल्या नुकसानीची पाहणी करून जास्त नुकसान झालेल्यांना आपल्याकडून मदतीचा हात दिला. बुधवारपासून आठवडाभर सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत बांधकाम साहित्य विक्री दुकानांना दोन तास दुकान चालू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व करोना रुग्णालये, ऑक्सिजन प्लांटचा वीज पुरवठा अथक परिश्रम करून सुरू करण्यात यश आले आहे. हापूसला फटका, १५ वर्षांचे नुकसान शेवटच्या टप्प्यातील चाळीस टक्के रत्नागिरी हापूस आंबा वादळवाऱ्यामुळे खाली पडल्याने बागायतदारांचे लाखोंचे नुकसान झाल्याचा महसूल यंत्रणेचा अंदाज आहे. अनेक ठिकाणी मोठे उत्पादन देणारी झाडे कोसळल्यामुळे पुढील १५ वर्षांचे कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा शेतकऱ्यांचा अंदाज आहे. ...आणि नातवाला वाचवले रत्नागिरी शहरालगत कर्ला गावातील अशोक कळंबटे यांच्या घरावर दोन भलीमोठी झाडे कोसळली. मात्र घरातील आजोबांनी जिवाची बाजी लावून झेप घेत पाच वर्षांच्या वेदांत या नातवाला आपल्या पोटाखाली घेतले आणि कोसळणारे पत्रे पाठीवर झेलले. त्यांना पाठीला मार बसला, पण नातवाला सुखरूप ठेवल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2S3jR68
No comments:
Post a Comment