Breaking

Wednesday, May 19, 2021

डोळ्यांदेखत सहकारी पाण्यात बुडत होते; ओएनजीसीच्या कर्मचाऱ्याला अश्रू अनावर https://ift.tt/3ymeoYO

म. टा. प्रतिनिधी, मुंबई 'ताशी १००-१२० किमी वेगाचे वारे, अंदाजे आठ मीटर उंचीच्या लाटा आणि खवळलेला समुद्र, यामध्ये निभाव लागणार नाही, याची स्पष्ट चिन्हे दिसत होती. मात्र, नौदलाची युद्धनौका नजरेस पडली आणि धीर आला. तोच धीर एकवटून समुद्रात उड्या टाकल्या,' असा थरार ''च्या 'पापा ३०५' या बार्जवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मांडला. मुंबईपासून ६५ ते ७० किमीवरील ओएनजीसीचा हा बार्ज (तेल उत्खनन करण्यासाठीचा निवासी तरंगता फलाट) सोमवारी '' चक्रीवादळात बुडाल्यावर तेथील वाचलेले कर्मचारी बुधवारी नौदल नौकेने मुंबईत आले. त्या वेळी प्रसारमाध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यात हा थरार समोर आला. या 'बार्ज'वर फिटर म्हणून काम करणारे आशिष म्हात्रे म्हणाले, 'सोमवारी दुपारपर्यंत सारे काही सुरळीत होते. मात्र, दुपारनंतर वाऱ्यांचा आणि लाटांचा जोर खूपच वाढला. अचानक बार्जमध्ये पाणी भरू लागले. तो बुडणार हे नक्की होते. सर्वांनी तातडीने लाइफ जॅकेट घातले; पण येईपर्यंत कोणीही बार्ज सोडायला तयार नव्हते. जशी युद्धनौका नजरेस पडली सर्वांनी पटापट उड्या मारल्या. त्यानंतर सुरू झाला समुद्राशी लढा. उड्या मारल्यानंतरही पाण्याचा वेग इतका अधिक होता की, युद्धनौका आमच्या जवळच पोहोचू शकत नव्हती. पण मनात आत्मविश्वास कायम होता. त्या स्थितीत १५ तास पाण्यात पोहत राहिलो. त्यानंतर नौदलामुळे वाचलो.' हा बार्ज नांगर तुटून सोमवारी रात्री पाण्यात बुडाला. बुडण्यावेळी कर्मचाऱ्यांनी उड्या मारताना गट केले. गटागटांनी एकमेकांचा हात पकडून त्यांनी स्वत:ला समुद्राच्या स्वाधीन केले. उड्या मारल्यावर ८-८, १०-१० जण खवळत्या समुद्रात एकमेकांचे हात पकडून होते. पण ८ मीटर उंच लाटेचा जोर इतका होता की, अनेक सहकाऱ्यांचे हात सुटले. याबाबतच्या भावना रामकरण यांनी मांडल्या. ४५ वर्षीय रामकरण हे बार्जवर ग्राईंडरचे काम करीत होते. ते म्हणाले, 'आम्ही उड्या तर मारल्या. पण समुद्राला स्वत:च्या जवळ केल्यानंतर आमचेच सहकारी आमच्यापासून दूर जातील, याची कल्पना नव्हती. काही कळायच्या आत अनेकांचे हात सुटले व आम्ही सर्व पाण्याच्या प्रवाहात दूर दूर फेकले गेलो. डोळ्यांदेखत कोणी सहकारी पाण्यात बुडत होता तर कोणी दूर जात होता. नौदल आले म्हणून वाचलो. मात्र, ते दृश्य डोळ्यांसमोरून जात नाही,' हे सांगताना रामकरण यांना रडू आवरत नव्हते. 'काही बेशुद्ध स्थितीत नौकेवर' बार्ज सुमारे ३० फूट उंच होता. तो बुडणार हे ध्यानात येताच तेवढ्या उंचीवरून कर्मचाऱ्यांनी रात्रीच्या अंधारात समुद्रात उड्या घेतल्या. या धक्क्याने अनेक जण बेशुद्ध पडले. सहकाऱ्यांनी त्यांना पाच-पाच तास पकडून ठेवले व बेशुद्ध अवस्थेतच नौदल नौकेवर चढवले. यादरम्यान अनेकांच्या पायाला जखमा झाल्या. 'अॅफकॉन्सचा निर्णय चुकला' म. टा. प्रतिनिधी, मुंबई 'मुंबई हाय'जवळील बार्ज अपघातासंबंधी 'अॅफकॉन्स' कंपनीचाच निर्णय चुकला, अशा भावना या दुर्घटनेत वाचलेल्यांनी व्यक्त केल्या. वाचलेले कर्मचारी बुधवारी नौदलाच्या युद्धनौकेने मुंबईत पोहोचले. त्या वेळी त्यांनी हे मत मांडले. कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या हिरा इंधन विहीर परिसरात ही घटना घडली, तेथे एकूण तीन बार्ज कार्यरत होते. या विहिरी व ही जागा तेल व नैसर्गिक वायू महामंडळ अर्थात 'ओएनजीसी'च्या असल्या तरी बार्ज हे 'अॅफकॉन्स लिमिटेड'कडून चालवले जात होते. बार्जचे संपूर्ण व्यवस्थापन 'अॅफकॉन्स' लिमिटेड या कंपनीकडेच होते. चक्रीवादळाचा इशारा आल्यानंतर दोन बार्ज मुंबईच्या किनाऱ्याकडे रवाना करण्यात आले. मात्र, या तिसऱ्या बार्जला मात्र तेथेच थांबण्यास सांगण्यात आले. त्याचे कारण मात्र कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले नाही. हा निर्णय चुकला आणि पुढे भीषण असा अपघात घडला. काही कर्मचाऱ्यांनी सांगितले की, 'आम्ही बार्जच्या कॅप्टनला रविवारी सकाळीच हलण्याबाबत विचारले; पण कॅप्टनने कुठलाही निर्णय घेतला नाही. त्यानंतर सोमवारी दुपारी भीषण घटना घडली. आम्ही लहान कर्मचारी आहोत. वरिष्ठ पातळीवरील अधिकारीच निर्णय घेत असतात. आम्ही हतबल होतो.' 'अॅफकॉन्सचा प्रतिसाद नाही' बार्जलादेखील किनाऱ्याकडे रवाना का करण्यात आले नाही, या प्रश्नासह अन्य काही चौकशीचा ई-मेल 'महाराष्ट्र टाइम्स'ने अॅफकॉन्स लिमिटेड यांना पाठवला. मात्र, त्याला त्यांनी कुठलेही उत्तर किंवा प्रतिसाद आला नाही. याचप्रमाणे केंद्र सरकारच्या ओएनजीसीलाही ई-मेलद्वारे प्रश्न विचारण्यात आले; पण त्यांनीदेखील प्रतिसाद दिला नाही.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3ypEjil

No comments:

Post a Comment