Breaking

Tuesday, June 29, 2021

...तर करोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांना कमी धोका https://ift.tt/362n3ms

मुंबईतील लहान मुलांच्या रक्ताच्या नमुन्यांचे (सिरोलॉजिकल) सर्वेक्षण करण्यात आले. त्यात मुंबईतील ५० टक्क्यांपेक्षा जास्त बालकांमध्ये अँटीबॉडीज विकसित झाल्याचे आढळले. यापूर्वीच्या सर्वेक्षणाच्या तुलनेत अँटीबॉडी आढळलेल्या मुलांची संख्या जास्त असून, ही दिलासा देणारी बाब आहे. तिसऱ्या लाटेमध्ये तीव्र स्वरूपाचा संसर्ग मुलांना होणार नाही, अशीही शक्यता या सर्वेक्षणाच्या मुख्य अन्वेषक आणि नायर रुग्णालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या गृहअधिकारी यांनी व्यक्त केली आहे. मुलांमधील सर्वेक्षण करण्याची गरज का जाणवली? वेगवेगळ्या देशांमध्ये मुलांमध्ये करोना संसर्गाचे प्रमाण व प्रभाव कितपत आहे याचा म्हणावा तितका अभ्यास झालेला नाही. मुलांमध्ये लसीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांना झालेल्या संसर्गाचे प्रमाण किती आहे, याचा अभ्यास करणे अधिक गरजेचे होते. संसर्गामुळे शाळा-महाविद्यालये बंद असतानाही मुलांमध्ये संसर्ग वाढता आहे का? असल्यास त्याचे प्रमाण किती? या विविध टप्प्यांमध्ये त्यांचे वैद्यकीय विश्लेषण होण्याची निकड तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असताना, अधिक होती. या अभ्यासाने त्यासंदर्भात निश्चित दिशा दिली आहे. मुलांमध्ये अँटीबॉडी आहेत, याकडे वैद्यकीय दृष्टिकोनातून कसे पाहता येईल? मुलांमध्ये अँटीबॉडी आहेत याचा अर्थ मुलांमध्ये करोनाच्या विरोधातील प्रतिकारक्षमता आहे. त्यामुळे या सर्वेक्षणाचे वैद्यकीय महत्त्व अधिक आहे. करोना संसर्ग या मुलांना होण्याची शक्यता अतिशय कमी झाली आहे. दुसऱ्या बाजूने मुलांनी करोना प्रतिबंधासाठी असलेल्या नियमांचे पालन केले नाही, असाही निष्कर्ष त्यातून पुढे येतो. हात धुणे, सुरक्षित अंतर राखणे, तसेच करोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, म्हणून मास्क लावणे यासंदर्भात मुलांमध्ये अधिक जाणीवपूर्वक माहिती देण्याची गरजही यातून स्पष्ट झाली आहे. या संसर्गाचा स्रोत काय असावा असे वाटते? असे निश्चितपणे सांगता येत नाही. कुटुंबातील मोठ्या सदस्यांकडूनच संसर्ग झाला असेल, असेही सांगता येत नाही. या सर्वेक्षणात १० ते १४ वयोगटातील सर्वाधिक म्हणजे ५३.४३ टक्के मुलांमध्ये सर्वाधिक अँटीबॉडी असल्याचे दिसून आले आहे. ही मुले खेळत होती. बाहेर ये-जा करणारी होती. त्यामुळे त्यांना संसर्ग होण्याच्या शक्यताही अनेक असू शकतील. खासगी प्रयोगशाळांमधील नमुने तपासण्यामागील नेमके कारण काय? पालिका रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांचा सामाजिक-आर्थिक स्तर हा वेगळा असतो; तर खासगी रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सेवा घेणाऱ्या रुग्णांचा स्तर वेगळा असतो. सर्वेक्षणामध्ये समाजातील प्रत्येक घटकाचे प्रतिबिंब असावे, या उद्देशाने या प्रयोगशाळांमधील नमुनेही यात घेण्यात आले आहेत. ज्या कारणांसाठी या मुलांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या त्या झाल्यानंतर नळीमध्ये शेवटी राहिलेले थेंब या अभ्यासासाठी वापरण्यात आले. १ एप्रिल ते १५ जूनपर्यंतचे नमुने या अभ्यासामध्ये घेण्यात आले आहे. दुसरी लाट अधिक चढताना व उतरताना अशा दोन्ही टप्प्यांमधील नमुने यात घेण्यात आले आहेत. तिसरी लाट आल्यास मुलांना मोठ्या प्रमाणात संसर्ग होईल, असे वाटते का? तिसरी लाट आल्यास मुलांवर तितक्या तीव्र स्वरूपाचा संसर्ग होईल, असे वाटत नाही. दुसऱ्या लाटेमध्ये कुटुंबातील अनेक सदस्यांना संसर्ग झाला आहे, अशा कुटुंबातील काही मुलांनाही संसर्ग झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे दुसऱ्या लाटेमध्ये संसर्गाचा प्रकार जसा होता, तसाच तो तिसऱ्या लाटेमध्ये असण्याची शक्यता आहे. (मुलाखत - शर्मिला कलगुटकर)


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2To3qlM

No comments:

Post a Comment