Breaking

Tuesday, June 29, 2021

'त्या' ७२७ पोलीस अधिकाऱ्यांची मुंबईबाहेर बदली होणार https://ift.tt/3drW9Zk

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ ठेवण्यात आलेल्या जिलेटिन कांड्यांचा स्फोट झाला नसला तरी या प्रकरणाचे हादरे अद्यापही दलास बसत आहेत. याप्रकरणात सचिन वाझेसह पाच आजी-माजी पोलिसांचा सहभाग उघड झाल्यानंतर मुंबई पोलिस दलामध्ये सुरू झालेली उलथापालथ थांबलेली नाही. गुन्हे शाखेमध्ये बदलीचे वारे वाहिल्यानंतर आता मुंबईत ८ वर्षांपेक्षा अधिक काळ सेवा बजावलेल्या ७२७ अधिकाऱ्यांना मुंबईबाहेर पाठविण्यात येणार आहे. अँटिलिया स्फोटके आणि पोलिसांनीच घडवून आणल्याचे समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांच्या प्रतिमेला डाग लागला. हा डाग पुसून काढण्यासाठी बदल्यांचे सत्र सुरू करण्यात आले. परमबीर सिंह यांना आयुक्तपदावरून हटविण्यात आल्यानंतर सर्वप्रथम गुन्हे शाखेला वाझे प्रकरणाचा फटका बसला. सुरुवातीला ६५ अधिकाऱ्यांची इतरत्र बदली करण्यात आली. त्यानंतर काही दिवसांनी आणखी अधिकाऱ्यांना गुन्हे शाखेतून हलविण्यात आले. यामुळे गुन्हे शाखा पूर्णतः खिळखिळी झाली. अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरन हत्या प्रकरणाचा तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. आतापर्यंत या प्रकरणात एनआयएने सचिन वाझे, सुनील माने, रियाझुद्दीन काझी, विनायक शिंदे आणि प्रदीप शर्मा या आजी-माजी पोलिस अधिकाऱ्यांना अटक केली आहे. यामध्ये आणखी काही पोलिस अधिकारी एनआयएच्या रडारवर आहेत. एनआयएचे एका बाजूला अटकसत्र सुरू असताना दुसरीकडे त्याचे हादरे मुंबई पोलिस दलास बसत आहेत. पोलिस दलातील नियमाप्रमाणे एका जिल्ह्यामध्ये सलग आठ वर्षे सेवा दिल्यानंतर दुसऱ्या जिल्ह्यात बदली केली जाते. याच नियमावर बोट ठेवून मुंबईतील ७२७ अधिकाऱ्यांची इतर जिल्ह्यामध्ये बदली करण्यात येणार आहे. यामध्ये ८९ वरिष्ठ पोलिस निरीक्षक, २५३ निरीक्षक, ३७५ सहाय्यक निरीक्षक आणि १० उपनिरीक्षकांचा यामध्ये समावेश आहे. इतर जिल्ह्यात बदलीसाठी तीन पसंतीची ठिकाणे कळवावीत, असे एका आदेशान्वये त्यांना सांगण्यात आले आहे. त्यानुसार लवकरच या बदल्या केल्या जातील, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. इतक्या मोठ्या संख्येने अधिकाऱ्यांची मुंबईबाहेर बदली करण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी, असेही ते म्हणाले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/362KSug

No comments:

Post a Comment