म. टा. प्रतिनिधी, मुंबई घोटाळ्यांचे आरोप, आघाडी सरकारमधील असमन्वयाच्या चर्चा आणि पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत राजकीय भेटीगाठी वाढल्या आहेत. मंगळवारी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांची भेट झाली. त्यात पावसाळी अधिवेशन तोंडावर असल्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीबाबत चालढकल न करता हे पद काँग्रेसला देण्याबाबत ठाकरे आणि पवार यांच्या बैठकीत मतैक्य झाल्याचे समजते. तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यानंतर मंत्रिमंडळातील काही सदस्यांवर राजकीय हेतूने सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) कारवाई होऊ शकते. यामुळे केंद्र सरकारशी एकजुटीने मुकाबला करण्याचा मानस उभयतांच्या भेटीत व्यक्त झाल्याचे समजते. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर, 'आमचा पक्ष देशमुख यांच्या पाठिशी ठामपणे उभा आहे', असे पक्षप्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले. वाचा: पवार आणि ठाकरे यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. मात्र त्यात काहीच तथ्य नव्हते. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या मातोश्री, वर्षा आणि सिल्व्हर ओक या बंगल्यांच्या फेऱ्या झाल्यानंतर मंगळवारी वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी पवार आणि ठाकरे यांच्यात सुमारे तासभर चर्चा झाली. महाविकास आघाडीत काँग्रेसने विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देताना त्याची पूर्व कल्पना आघाडीतील अन्य नेत्यांना दिली नव्हती. मात्र, राज्यातील सत्ताकारण आणि केंद्र सरकारच्या तपास यंत्रणांची कारवाई लक्षात घेता विधानसभा अध्यक्षपदाची निवड करण्याचा प्रश्न अधिक काळ पुढे ढकलता कामा नये, यावर उभय नेत्यांत एकमत झाल्याचे समजते. हे पद काँग्रेसला विनासायास देतानाच, याच अधिवेशनात त्यावर मार्ग निघण्याची शक्यता आहे. पावसाळी अधिवेशनातच विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. विधानसभा अध्यक्ष हा काँग्रेसचाच असेल, असा दावाही नेत्यांकडून करण्यात येत आहे. तर भाजप नेत्यांनीही याच मुद्द्यावरून राज्य सरकारवर सातत्याने हल्ला सुरू ठेवला आहे. या पार्श्वभूमीवर अध्यक्षपदाच्या निवडीबाबत आता फार चालढकल करू नये. महाविकास आघाडी निवडणूक जिंकेल. त्याबाबत चिंता नको, अशी चर्चाही या बैठकीत झाली. निर्बंधांबाबत आढावा महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे होत आली तरी अद्याप महामंडळांचे वाटप झालेले नाही. महामंडळाचे वाटप करून सत्ताधारी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातील दुसऱ्या फळीतील नेत्यांना दिलासा देण्याची मागणी सातत्याने होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पवार आणि ठाकरे यांच्या भेटीत चर्चा झाल्याचे समजते. करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र करोना निर्बंधांबाबत अन्य राज्यांतील स्थितीचा आणि निर्णयाचा आढावा घेतला पाहिजे. सततच्या निर्बंधांमुळे सर्वसामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्याचबरोबर राज्याची आर्थिक घडीही विस्कटत आहे. या मुद्द्यावरही या बैठकीत चर्चा झाल्याचे कळते.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3jy9vah
No comments:
Post a Comment