म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई पालिकेने लसीकरणास वेग मिळावा, म्हणून सध्याच्या पालिका केंद्रांसह २२७ विभागांत लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी धडपड चालवली आहे. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी सहकार्य दर्शवित अनेक ठिकाणी केंद्र सुरू करण्यास साहाय्य केले आहे. मात्र, काही ठिकाणी पालिकेने उभारलेल्या लसीकरण केंद्राचे श्रेय स्वतःकडे घेण्यासाठीही स्पर्धा सुरू झाल्याचे दिसत आहे. पालिकेने त्याची गंभीर दखल घेत, तसे प्रकार तातडीने थांबवावेत, असे स्पष्ट आदेश जारी केले आहेत. पालिकेने लसीकरणाची तीव्रता वाढावी, म्हणून स्थानिक पातळीवर केंद्रे वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी काही विभागातील एक ठिकाण लसीकरण केंद्र म्हणून निवडून तिथे आवश्यक त्या पायाभूत सुविधाही पुरविल्या आहेत. मात्र, या प्रकारे काही केंद्रे सुरू झाली असतानाच काही विभागातील लोकप्रतिनिधी, नेते, कार्यकर्ते यांनी त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्याचेही प्रकार घडले. आपल्या विभागात सुरू झालेली लसीकरण केंद्रे ही जणू पक्ष, लोकप्रतिनिधी, नेते आदींनी स्वखर्चाने आणि पुढाकाराने सुरू केली असल्याप्रमाणे जाहिरातबाजी झाल्याचेही दाखवले दिले जात आहेत. त्या लसीकरण केंद्रांच्या उद्घाटन सोहळ्यांचीही तितकीच जाहिरातबाजी केली गेली. तिथे परिसरात मोठमोठे होर्डिंग, पोस्टरवर त्या-त्या पक्षाच्या नेत्यांच्या छबीदेखील झळकत गेल्या. श्रेय घेण्याचा हा प्रकार मुंबईकरांच्या पचनी पडला नव्हता. पण आता पालिकेनेही त्याची दखल घेत त्यावर तंबी दिली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3g8K8s7
No comments:
Post a Comment