मुंबई : कच्च्या तेलाचा भाव प्रचंड वाढल्याने मागील दोन महिन्यात पेट्रोलियम कंपन्यांनी तब्बल ३२ वेळा दरवाढ केली आहे. पेट्रोल आणि डिझेलमध्ये सरासरी ८ रुपयांची वाढ झाली आहे. दरम्यान, आज सोमवारी कंपन्यांनी दरवाढीला तूर्त विश्रांती दिली. आज देशभरात पेट्रोल आणि डिझेल दर जैसे थेच आहेत. पेट्रोल आणि डिझेलसह इतर इंधन दर जागतिक बाजाराशी संलग्न केल्याचे परिमाण भारतीय ग्राहकांना भोगावे लागत आहेत. करोना संकटातून जागतिक अर्थव्यवस्था सावरू लागली आहे. विशेषतः अमेरिका आणि युरोपात आता वाहतूक व्यवस्था हळुहळू पूर्वपदावर येत आहे. त्यामळे तेथील इंधन मागणी वाढली आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा मर्यादित असल्याने कच्च्या तेलाच्या किमतीत मागील महिनाभर तेजी आहे. तेलाचा भाव ७६ डॉलरवर गेला आहे. या आठवड्यात देखील ही तेजी कायम राहण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, आज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झाला नाही. यापूर्वी शनिवारी आणि रविवारी कंपन्यांनी दरवाढ केली होती. रविवारी पेट्रोल दरात ३५ पैसे आणि डिझेल दरात २४ पैसे वाढ करण्यात आली होती. तर शनिवारी पेट्रोल आणि डिझेल दरात प्रत्येकी ३५ पैशांची वाढ केली होती. आज सोमवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०४.६२ रुपयांपर्यंत वाढला आहे. दिल्लीत पेट्रोल ९८.५२ रुपये झाले आहे. चेन्नईत पेट्रोलचा ९९.५५ रुपये इतका भाव वाढला आहे. तर कोलकात्यात एक लीटर पेट्रोल ९८.३६ रुपये आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव १०६.७७ रुपये आहे. मुंबईत आजचा डिझेलचा भाव ९६.४८ रुपये आहे. जाणकारांच्या मते, इंधन दरवाढीचा सपाटा असाच सुरु राहिला तर लवकरच मुंबईत डिझेल शंभरी गाठेल. दिल्लीत डिझेल ८८.९५ रुपये आहे. चेन्नईत ९३.१५ रुपये आणि कोलकात्यात ९१.८० रुपये डिझेलचा भाव आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९७.६७ रुपये झाला आहे. आजच्या घडीला देशातील सर्वात महाग डिझेल भोपाळमध्ये मिळत आहे. आज सिंगापूरमध्ये ब्रेंट क्रूडचा भाव ०.१९ डॉलरने वधारला असून तो ७६.३७ डॉलर झाला आहे. तर यूएस टेक्सासमध्ये डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ०.१६ डॉलरने वधारला असून तो ७४.२१ डॉलर प्रती बॅरल झाला आहे. या आठवड्यात देखील कच्च्या तेलाच्या बाजारात तेजी राहण्याचे संकेत आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2TfXPhn
No comments:
Post a Comment