करोनाकाळाने जीवनाचे अनेक रंग दाखवले. सर्वसामान्यांना वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी जिवाची पर्वा न करता काम करत होते. यात अनेक डॉक्टरांनाही करोनाची लागण झाली. या आजाराने त्यांनाही अंतर्बाह्य बदलून टाकले. रुग्णांप्रती असलेली संवेदनशीलता वाढली. माणूस म्हणून अधिक कृतज्ञतेने वागण्याचे आत्मभान आल्याचे, करोनावर मात केलेल्या या डॉक्टरांनी प्राजंळपणे सांगितले. स्वतः रुग्णाच्या भूमिकेत गेल्यानंतर वैद्यकीय सेवेमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्याचा प्रयत्नही त्यांनी आर्वजून केला. आजच्या 'डॉक्टर दिना'निमित्त आत्मशोधाच्या प्रवासातले या डॉक्टरांचे हे प्रातनिधिक अनुभव... करोनाने मानवी बाजू दाखवली - डॉ. संजय ओक वैद्यकीय व्यवसायाला एक मानवी बाजू असते. ही मानवी बाजू मला या करोना काळातल्या आजारपणाने दाखवली. नातेसंबध अधिक दृढ झाले. आपण दररोज प्रेम व्यक्त करतो, आय लव्ह यू म्हणतो अशी काही आपली संस्कृती अशी नाही. पण, मला करोना झाल्यानंतर मुलाच्या डोळ्यात दाटलेली जी काळजी होती, नुकतेच बोबडे बोल बोलायला लागलेला नातू आबू आबू हाका मारायचा तेव्हाची भावना शब्दांत व्यक्त करता येणार नाही. नातेसंबध अधिक दृढ झाले. नात्यांचा नव्याने शोध घेता आला. आपल्यासोबत काम करणारे रुग्णालयातील सहकारी, मित्र किती काळजी करतात याचीही जाणीव झाली. वैद्यकीय क्षेत्रातल्या काही उणिवा या काळात प्रकर्षाने लक्षात आल्या. आयसीयूमधील वैद्यकीय काळजी उत्तमप्रकारे घेतली जाते. पण, त्या रुग्णाचा बाहेरच्या जगाशी असलेला संबध तुटलेला असतो. त्याला दिवस अन् रात्र यामधील भेद लक्षात येत नाही. त्या रुग्णाचे अस्तित्त्व हे केवळ खाट क्रमांकाने शिल्लक राहते. डॉक्टर संवाद साधतात तो त्याच्या शरीराबद्दल असतो. ताप आला होता का? पोटात दुखते का? या प्रश्नांच्या पलीकडे जात तुम्हाला आता कसे वाटते? कुटुंबाला काही सांगायचे आहे का? तुमच्यासाठी काही करू का? या मानसिक बाजूंचा विचार, हा ओलावा असायला हवा. आयसीयूमध्ये एक रुग्ण बरा होऊन बाहेर जातो, त्याची जागा दुसरा रुग्ण घेतो. त्यावेळी रुग्णसंख्येच्या दृष्टीने या विभागातील खाटांचे नियोजन किती तोकडे आहे हे लक्षात य़ेते. अंदाजे आयसीयूमधील वैद्यकीय खर्चाचे गणित मांडले, तर प्रतिदिन ३० हजार रुपयांचा खर्च येतो. सरकारने त्यावर नऊ-साडेनऊ हजार रुपयांची मर्यादाही घातली आहे. ती योग्य असली, तरीही यात जे अंतर राहते भरून काढायला पावले उचलण्याची गरज आहे. त्याशिवाय रुग्णालये जगणार नाहीत. 'मेक इन इंडिया'ला खऱ्या अर्थाने स्वीकारायचे असेल, तर केवळ व्हेंटिलेटर तयार करून चालणार नाही; तर तो व्हेंटिलेटर विकत घेऊन तो वापरायला लागल्यानंतर त्यासाठी भारतामध्ये बाजारपेठ उपलब्ध करणे गरजेचे आहे, असे आरोग्यव्यवस्थेमधील प्रशासक, नियोजनकर्ता म्हणून मला प्रकर्षाने वाटते. अधिक संवेदनशील बनले डॉ. विद्या ठाकूर, वैद्यकीय अधीक्षक, राजावाडी रुग्णालय करोना संसर्ग सुरू झाला तेव्हा नेमकी औषधोपचारपद्धती कोणती, काय काळजी घ्यायची... हे सगळे टप्प्याटप्याने चुकतमाकत शिकत होतो. राजावाडी रुग्णालयात करोना रुग्णांवर उपचार केले जात होते. गेल्यावर्षी जून-जुलैमध्ये रुग्णसंख्या वाढली. मृत्यूही होत होते. रुग्णांना सेवा देणाऱ्या काही डॉक्टरांचे मृत्यू झाल्याचे कळल्यानंतर तर दुःख, धास्ती, अस्वस्थता अशा संमिश्र भावना दाटून यायच्या. त्यावेळी रुग्णालयामध्येही खूप मृत्यू पाहिले होते. या काळात थेट रुग्णालयात संसर्गाला बळी पडलेले दहा ते अकरा मृतदेहही आणण्यात आले होते. अस्वस्थ करणारे दिवस होते ते... अशा या परिस्थितीत मला करोना झाला, तेव्हा धास्ती वाटली. पण, वैद्यकीय यंत्रणेवरचा विश्वास खंबीर होता. त्यामुळे आपल्याला काही होणार नाही या विश्वासातून मी, माझे पती आणि मुलगी सेव्हनहिल्स रुग्णालयामध्ये दाखल झालो. या दिवासांनी काय दिले असे विचाराल, तर रुग्णाकडे अधिक संवेदनशीपणे पाहायला शिकले. करोनाशी संघर्ष करत असताना आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. मुलगी आणि पती बरे होऊन घरी गेल्यानंतर रुग्णालयात मला खूप एकटे आणि उदास वाटायला लागले. मोबाइल, तंत्रज्ञानाची ओळख असल्याने ओटीटी मंचावर सिनेमे पाहत होते, गाणी ऐकत होते. त्यावेळी त्या रुग्णालयात येणाऱ्या गरीब वर्गातील रुग्णांचा विचार सतत मनात यायचा. त्यांना भीती वाटत असेल, एकटेपणा जाणवत असेल तेव्हा ते काय करत असतील? हा विचार यायचा. म्हणूनच मग राजावाडी रुग्णालयात नंतर म्युझिक सिस्टीम, टीव्ही लावण्यात आले. आहाराचे महत्त्व लक्षात घेऊन अधिक पोषक आहार, हळदीचे दूध देण्यास सुरुवात झाली. रुग्णालयात असताना वैद्यकीय कर्मचारी, सहकारी डॉक्टर विचारपूस करायचे. त्यांच्याबद्दलही अधिक ममत्वाची भावना मनात रुजली. रुग्णालयात काम करणारे तृतीय व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या कष्टाची जाणीव दृढ झाली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3qBxt5V
No comments:
Post a Comment