Breaking

Tuesday, June 1, 2021

रस्त्यावर थुंकल्यास १२०० रुपये दंड; नागरिकांवर जरब बसवण्यासाठी पालिकेचा निर्णय https://ift.tt/3uFQ3u4

जरब बसवण्यासाठी पालिकेकडून रकमेत वाढ करण्याचे पाऊल म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः करोनाने स्वच्छतेचे महत्त्व आणखी वाढले असले तरीही सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांचे प्रमाण कमी होत नाही. पालिकेकडून थुंकणाऱ्यांसाठी प्रबोधन, कारवाई असे सगळे मार्ग अवलंबले तरीही सवयीमध्ये बदल होताना दिसत नाही. त्यामुळेच आता पालिकेकडून त्यावरील कारवाईतील दंडाची रक्कम २००रुपयांवरून थेट १,२००पर्यंत नेण्यात येणार आहे. या वाढीव दंड रकमेने कुठेही थुंकणाऱ्यांना जरब बसणार आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याने विविध आजार पसरू शकतात हे लक्षात घेऊन पालिकेकडून त्यावर कारवाई केली जाते. करोना कहर सुरू झाल्यानंतर पालिकेने ही कारवाई अधिकच तीव्र केली आहे. तरीही थुंकणाऱ्यांचे प्रमाण कमी होत नसल्याने पालिकेने त्या दंडाच्या रकमेत वाढ करण्याचे ठरविले असून त्या प्रस्तावास पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी मान्यता दिली आहे. सध्या पालिकेकडून त्यासाठी २०० रुपये दंड आकारला जात आहे. त्यासंदर्भात उच्च न्यायालयाने काही महिन्यांपूर्वी दिलेल्या आदेशात मुंबई उच्च न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यासंदर्भातील एका सुनावणीदरम्यान पालिकेकडून २०० रुपये दंड आकारण्यावरून विचारणा केली होती. पोलिसांकडून थुंकणाऱ्यांविरोधात १,२०० रुपये दंड आकारला जात असल्याकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर पालिकेनेही दंडाच्या रकमेत वाढ करण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे. त्यानुसार नवीन दंडाची रक्कम ही १,२०० पर्यंत वाढविताना त्यास पालिका सभागृहाची संमती घेऊन हा प्रस्ताव राज्य सरकारच्या मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दंडाची रक्कम २०० रुपये एवढीच असल्याने या रकमेत वाढ करण्याचे पालिका प्रशासनाने ठरविले आहे. त्या दंडाच्या रकमेत वाढ करण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया हाती घेण्यास पालिका आयुक्तांनी संमती दिली आहे. त्यानुसार अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याकडून प्रक्रिया सुरू करण्यात येत असल्याचे उपायुक्त संजोग कबरे यांनी सांगितले. २८ लाखांचा दंड वसूल पालिकेने गेल्या सहा महिन्यांत सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर केलेल्या कारवाईत २८ लाख रुपयांची दंडवसुली केली आहे. १४ हजारांपेक्षा अधिक व्यक्तींकडून २८ लाख ६७ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. सर्वाधिक वसुली कुर्ला विभागात गेल्या ६ महिन्यांच्या कालावधीत २८ लाख ६७ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल झाला आहे. त्यात कुर्ला (एल विभागातून) सर्वात जास्त म्हणजे ४ लाख ७० हजार रुपये दंड वसूल केला आहे. त्यानंतर, 'ए' विभागातून ३ लाख २९ हजार रुपये, 'सी' विभागातून २ लाख ७१ हजारांवर दंड वसुली केली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3yXmgQX

No comments:

Post a Comment