Breaking

Tuesday, August 3, 2021

भारतीय महिला हॉकी संघातील सलिमा टेटेचं दुर्दैव, उपांत्य सामना संपूर्ण जग पाहणार पण कुटुंबिय नाहीत... https://ift.tt/3CcFOSU

नवी दिल्ली : भारताच्या महिला हॉकी संघाने इतिहास रचत उपांत्य फेरी गाठली. त्यामुळे उद्या अर्जेंटीनाबरोबर होणाऱ्या भारताच्या या सामन्यावर संपूर्ण जगाचे लक्ष असेल. पण भारतीय संघातील सलिमा टेटेच्या कुटुंबियांना मात्र हा सामना लाइव्ह पाहता येणार नाही. कारण सलिमा राहत असलेल्या गावात टीव्ही नाही. त्याचबरोबर गावात मोबाईची रेंज नाही तर इंटरनेट येणार तरी कुठून, त्यामुळे सलिमाला जेव्हा संपूर्ण जग पाहत असेल तेव्हा तिच्या घरच्यांना मात्र तिला लाइव्ह खेळताना पाहता येणार नाही. भारताच्या ग्रामीण भागातील लोकं अजूनही कशा अवस्थेत राहतात, याचे हे एक भीषण वास्तव आता सर्वांसमोर आलेले आहे. सलिमा ही झारखंडमधील बडकिचपार या गावात राहते. हे गाव ४५ कुटुंबांचं आहे. पण गावाची अवस्था फारच बिकट आहे. पण तरीही सलिमाची बहिण महिमाने एक खास संदेश आपल्या बहिणीसाठी दिला आहे. महिमादेखील एक राष्ट्रीय हॉकीपटू आहे. महिला यावेळी म्हणाली की, " आम्हाला सलिमाचा अभिमान वाटतो. आमच्यासाठी ही फार आनंदाची बातमी आहे. ज्या भारतीय संघाने इतिहास रचला त्या संघाचे ती प्रतिनिधीत्व करत आहे. आम्हाला अशी आशा आहे की, भारतीय संघ ही उपांत्य फेरीदेखील जिंकेल." गावातील दुरावस्थेबाबत महिमा म्हणाली की, " गावामध्ये कोणकडेही साधा टीव्ही नाही, मोबाईची रेंज नाही. काहीवेळेला रेंज आली तर स्पष्ट ऐकूही येत नाही. आम्हाला सर्वांना भारतीय महिला हॉकी संघाचा उपांत्य फेरीचा सामना पाहायचा होता. पण ते शक्य होईल, असे आम्हाला वाटत नाही. पण आम्हा सर्वांच्या शुभेच्छा मात्र नक्कीच भारतीय संघाबरोबर असतील." एवढी दुरावस्था असूनही सलिमा खचली मात्र नक्कीच नाही. आपल्या आवडीच्या हॉकीचा खेळ तिने मनापासून जोपासला आणि आता थेट ती भारतीय संघाकडून खेळताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता ऑलिम्पिकनंतर घरी आल्यावर तरी तिच्या घरी टीव्ही आणि गावात मोबाईची रेंज येणार का, हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3lxNmdb

No comments:

Post a Comment