म. टा. खास प्रतिनिधी, व्हिडीओ कॉलद्वारे अश्लील चित्रफीत बनवून खंडणी उकळण्याचे प्रकार वाढत असतानाच हे भामटे अशा व्हिडीओंवर दुप्पट कमाई करीत असल्याचे समोर आले आहे. व्हिडीओंद्वारे खंडणी उकळतानाच दुसरीकडे याच व्हिडीओंची समाजमाध्यमांवर विक्री करून लाखो रुपये कमवण्याच्या येत आहेत. मुंबई सायबर पोलिसांनी 'सेक्सटॉर्शन' करून नागरिकांना फसवणाऱ्या आणि अश्लील व्हिडीओंची विक्री करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला नुकतीच अटक केली. विशेष म्हणजे ही टोळी चित्रपट क्षेत्रातील सेलिब्रिटींना लक्ष्य करीत होती. काहीजण खोटी आणि विशेषकरून मुलींच्या नावे प्रोफाइल तयार करून चित्रपट क्षेत्रातील सेलिब्रिटींसह सर्वसामान्य नागरिकांना व्हिडीओ कॉल करतात. या संभाषणाची अश्लील चित्रफीत तयार करून पैशासाठी धमकावले जाते. पैसे स्वीकारण्यासाठीसुद्धा बनावट बँक खाते आणि नावांचा वापर केला जातो. ही माहिती समजताच बीकेसी सायबर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक सहस्रबुद्धे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मजगर, सहाय्यक निरीक्षक पूनम जाधव यांच्यासह विजय जाधव, संकेत तावडे, सुरवसे या पथकाने तांत्रिक तपास सुरू केला. यामध्ये ओडिशामधून आरोपी अशाप्रकारे देशभरातील अनेकांची फसवणूक करत असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी चार पथके तयार करून एकाच वेळी उत्तर प्रदेश, गुजरात, ओडिसा आणि नागपूर येथे रात्री छापा टाकून पाच आरोपींना अटक करण्यात आली. गोविंद कुशवाह, सौरभ मंडल, सागर कीर्तने आणि भोजराज अशी त्यांची नावे असून, पोलिसांनी त्यांच्याकडून सहा मोबाइल हस्तगत केले आहेत. अशी होती गुन्हेपद्धत या पाच आरोपींनी तरुणींच्या नावाने ट्विटरवर पाच, इंन्स्टाग्रामवर चार आणि फेसबुकवर तीन खाती उघडली होती. याद्वारे प्रसिद्ध व्यक्ती, अभिनेते तसेच सर्वसामान्य नागरिकांशी ते संपर्क साधत. मैत्री झाल्यानंतर अर्धनग्न अवस्थेत संपर्क साधून त्यांनाही तसे करण्यास सांगितले जाई. त्यानंतर व्हिडीओ कॉल रेकॉर्ड करून पैशांची मागणी केली जात असे. २५० जणांच्या चित्रफिती विकल्या या आरोपींनी 'टेलिग्रामवर' एक ग्रुप तयार केला होता. त्यावर तयार केलेल्या चित्रफितींच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार केला जात होता. २५० जणांच्या चित्रफिती वेगवेगळ्या राज्यांतील सुमारे ८०पेक्षा अधिक व्यक्तींना या टोळीने विकल्याचे तपासातून समोर आल्याचे सायबर पोलिसांनी म्हटले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3C6jj1J
No comments:
Post a Comment