Breaking

Friday, August 27, 2021

कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीत वादंग; शिवसेनेची आक्रमक भूमिका https://ift.tt/3gFgiwj

कोल्हापूर : मुख्यमंत्र्यांनी दिलेला आदेश धुडकावून लावल्याचा आरोप करत जिल्हाप्रमुखांनी कार्यकर्त्यांसमवेत थेट दूध संघाच्या कार्यालयात धडक दिली. तसंच गोकुळमधील अधिकाऱ्यांना घेराव घालत धारेवर धरले. जिल्ह्यात महाविकास आघाडीत सुरू असलेल्या कुरघोडीच्या राजकारणामुळे शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात सध्या वादाला तोंड फुटलं आहे. काही दिवसांपूर्वी राज्याच्या नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी काँग्रेसच्या नेत्यावर आरोप करत निधी देताना दुजाभाव केला जात असल्याचं म्हटलं होतं. शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बहुतेक सर्वच पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला होता. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना दोन्ही काँग्रेसच्या मंत्र्यांकडून चांगली वागणूक मिळत नाही, निधी देताना हात आखडता घेतला जातो, असा थेट आरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत झाला होता. यामुळे जिल्ह्यात महाविकास आघाडीतीलच दोन प्रमुख पक्षातील अंतर वाढल्याचं स्पष्ट झालं होतं. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखानी महाविकास आघाडीची सत्ता असलेल्या गोकुळ दूध संघावर धडक मारत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. शासन नियुक्त संचालक म्हणून शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर जाधव यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नियुक्ती केली आहे. दोन महिन्यानंतरही जाधव यांना गोकुळच्या व्यवस्थापनाने संचालक म्हणून मान्यता दिली नाही. त्यामुळे संतापलेल्या जाधव यांनी शुक्रवारी गोकुळवर धडक मारली. कार्यकारी संचालक उपस्थित नसल्याने त्यांनी तेथील अधिकाऱ्यांना घेराव घालत आजच्या आज हा विषय मिटवा, जोपर्यंत विषय मिटणार नाही तोपर्यंत तुम्हाला बाहेर सोडणार नाही आणि आम्हीही बाहेर जाणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली. यामुळे बराच वेळ गोकुळमधील वातावरण तणावपूर्ण झाले होते. दरम्यान, विविध कारणावरून महाविकास आघाडीतील नेतेच आपला राग व्यक्त करत असल्याने ही धुसफूस आणखी वाढण्याची शक्यता आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3kt5PoR

No comments:

Post a Comment