Breaking

Saturday, August 28, 2021

धक्कादायक! अवघ्या १४ वर्षीय मुलीचा विवाह; भटजींसह वऱ्हाडींविरुद्धही गुन्हा https://ift.tt/3gGQmRf

: बालविवाहासंबंधी कितीही प्रबोधन आणि कारवाई केली तरी हे प्रकार थांबण्यास तयार नाहीत. करोना काळात अनेक विवाह रोखण्यात स्वयंसेवी संस्था आणि यंत्रणेला यश आले असलं तरी कित्येक विवाह होऊन गेले आहेत. पाथर्डीतील शिरसाटवाडी येथे असाच एक होऊ गेला. मात्र, स्वयंसेवी संस्थांनी ठाम भूमिका घेतल्याने प्रथमच संबंधितांवर कठोर कारवाई झाली आहे. वर, वधु-वराचे वडील, भटजी, मंडपावाले आणि वऱ्हाडींवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाथर्डी तालुक्यातील शिरसाठवाडी गावात ही घटना घडली. मुंबईतील मर्जी संघटना व नगरमधील चाईल्डलाईन संघटना यांनी याची माहिती पोलीस व पाथर्डीतील शिरसाटवाडीच्या सरपंचांना दिली होती. कायद्यानुसार शिरसाटवाडीच्या ग्रामसेविका अर्चना विठ्ठल सानप यांनी पाथर्डी पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यानुसार पाथर्डी पोलिसांनी मुलीचा पती, सासरा, सासू, मुलीचे वडील यांच्यासह २० ते २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुलाचे वडील शहादेव मच्छिंद्र शिरसाट, मुलगा सागर शिरसाट, मुलाची आई यांच्यासह शिरसाटवाडी व रांजणी या दोन्ही गावातील वऱ्हाडींचा समावेश आहे. बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये लग्न लावणारे पुरोहित, मंडप, सजावटकार तसेच विवाहास उपस्थित असणाऱ्या वऱ्हाडी मंडळींचाही समावेश आहे. नगर जिल्ह्यात प्रथमच अशा प्रकारचा व्यापक गुन्हा दाखल झाला आहे. बुधवारी (२५ ऑगस्ट) शिरसाठवाडीतील भैरवनाथ मंदिरासमोर हा विवाह झाला. त्याची माहिती मुंबईतील संस्थेला मिळाल्याने त्यांनी पाठपुरावा सुरू केला. त्यांना शुक्रवारी मुलीच्या वयाचे प्रमाणपत्र मिळाले. मुलीचे वय १४ वर्ष तर मुलगा २१ वर्षांचा आहे. घटना तर घडून गेली, मात्र फिर्याद कोणी द्यायची, असा प्रश्न निर्माण झाला. कारण यासंबंधी दोन्ही बाजूंकडून तक्रार असण्याचे कारणच नव्हते. स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी यातून मार्ग सांगितला. राज्य सरकारच्या २०१३ मधील यासंबंधीच्या एका अधिसूचनेप्रमाणे बालविवाह प्रतिबंधक अधिकारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. गावातील प्रशासनाने नेमून दिलेले ग्रामसेवक हे ग्रामपंचायत स्तरावर बालविवाह प्रतिबंधक अधिकारी असतात. चाईल्ड लाईन संस्थेने यासंबंधीची माहिती आणि कायदेशीर मदत उपलब्ध करून दिली. त्यानंतर ग्रामसेविका सानप यांनी फिर्याद दिली आणि पोलिसांना गुन्हा दाखल केला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3jp5B2V

No comments:

Post a Comment