Breaking

Tuesday, August 31, 2021

'...तर कोकणातील स्थिती वेगळी असती' https://ift.tt/3jDKHxf

म. टा. विशेष प्रतिनिधी, 'कोकणात जुलैमध्ये झालेल्या आपत्तीमध्ये अनेक लोकांचे प्राण गेले. जिल्ह्यातील नियोजित नागरी संरक्षण दलाची केंद्रे पूर्वीच खऱ्या अर्थाने कार्यान्वित केली असती, तर कदाचित परिस्थिती वेगळी असती. नैसर्गिक आपत्तीच्या धोक्यात हे जिल्हे आधीच घोषित झालेले असताना आणि नागरी संरक्षण दलाची केंद्रे उभारण्यासाठी केंद्र सरकारने पूर्वीच निधी दिला असताना ती कार्यान्वित करण्यात राज्य सरकारकडून दिरंगाई का केली जात आहे,' अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच, नागरी संरक्षण दल कायद्याच्या तरतुदींचे पालन का होत नाही आणि ही दोन्ही केंद्रे उभारण्यासाठी आतापर्यंत कोणती पावले उचलली, याबद्दल आता गृह विभागाच्या प्रधान सचिवांनीच दहा दिवसांत प्रतिज्ञापत्रावर उत्तर द्यावे, असे निर्देश दिले. 'केंद्र सरकारने रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, मुंबई व पालघर हे जिल्हे नैसर्गिक आपत्तीच्या दृष्टीने धोकादायक घोषित करून नागरी संरक्षण केंद्रे सुरू करण्याचा निर्णय २०११मध्ये घेतला आणि राज्य सरकारला निधी दिला. अन्य चार ठिकाणी केंद्रे कार्यान्वित झाली. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील केंद्रांसाठी जागा मिळाली आणि कर्मचारी भरतीची प्रक्रियाही सुरू झाली. मात्र, ती भरतीप्रक्रिया अद्याप अंतिम न झाल्याने केंद्रेही कार्यान्वित झाली नाही,' असे निदर्शनास आणणारी जनहित याचिका महसूल विभागातील निवृत्त अधिकारी शरद राऊळ यांनी अ‍ॅड. राकेश भाटकर यांच्यामार्फत केली आहे. रत्नागिरी व रायगडमध्ये अलीकडेच ओढवलेल्या नैसर्गिक आपत्तीत अनेकांचे प्राण गेले. अशा वेळी मदतीसाठी पुण्याहून एनडीआरएफची टीम येण्यास खूप विलंब झाला. ही दोन्ही केंद्रे सुरू असती, तर अडकलेल्या नागरिकांचा मोठा दिलासा मिळाला असता, असेही याचिकादारांनी निदर्शनास आणले. 'केवळ या दोन जिल्ह्यांचा विचार करण्याऐवजी आता संपूर्ण राज्यातील अशा नैसर्गिक आपत्तीप्रवण जिल्ह्यांचा विचार करून सर्वंकष धोरण आखण्याचा विचार आहे. त्यामुळे तीन महिन्यांचा कालावधी देण्याची सरकारची विनंती आहे,' असे म्हणणे सरकारी वकील भूपेश सामंत यांनी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर मांडले. तर 'अशा दोन केंद्रांची आवश्यकताच नाही, अशी भूमिका यापूर्वीच्या प्रतिज्ञापत्रात राज्य सरकारने घेतली होती आणि आता तीन महिन्यांचा अवधी मागितला जात आहे. वास्तविक मूळच्या केंद्र सरकारच्या योजनेतील ही केंद्रे असताना आणि कोकणाला अधिक धोका असताना राज्य सरकारकडून दिरंगाई केली जात आहे,' असे भाटकर यांनी निदर्शनास आणले. तेव्हा 'राज्य सरकारने सागरी किनारा असलेल्या जिल्ह्यांचा प्राधान्याने विचार करायला हवा. केंद्र सरकारच्या कायद्याप्रमाणे तुम्ही नागरी संरक्षण दलासाठी महासंचालकांचे पद निर्माण केले. मात्र, त्यांच्यासाठी आवश्यक मनुष्यबळ दिलेले दिसत नाही. ४३५ मंजूर पदे असताना केवळ १६३ पदे भरली. १०९ कर्मचाऱ्यांना सायबर सेल विभागाकडे वर्ग करण्यात आल्याचे दिसते. गृह विभाग या दलाविषयी गंभीर आहे की नाही,' असा सवाल खंडपीठाने उपस्थित केला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3zzUZUw

No comments:

Post a Comment