म. टा. प्रतिनिधी, गणपतीत कोकणात जाण्यासाठी आरटीपीसीआर चाचणीची सक्ती करण्यात आल्याने गणेशभक्तांमध्ये प्रचंड नाराजी आहे. अशातच आरटीपीसीआर चाचण्यांच्या गोंधळाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कल्याण ते बेळगाव रेल्वे प्रवासासाठी सरकारी केंद्रातून केली असता ती पॉझिटिव्ह आली. मात्र ४८ तासांच्या आत खासगी लॅबमध्ये चाचणी केली असता ती निगेटिव्ह आली. यामुळे सरकारी केंद्रावरील यंत्रणा सदोष आहे की तिसऱ्या लाटेच्या उंबऱ्यावर पॉझिटिव्ह रुग्ण दोन दिवसांत बरा होतो, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. कल्याणला राहणाऱ्या ५६ वर्षीय सुहासिनी मांजरेकर यांनी न्यायालयाच्या महत्त्वाच्या कामासाठी बेळगावला जाण्यासाठी २८ ऑगस्टचे रेल्वेआरक्षण केले. आरक्षण केल्यानंतर २५ ऑगस्टला कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या केंद्रात त्यांनी चाचणी केली. याचा अहवाल २७ ऑगस्टला पॉझिटिव्ह आला. 'माझ्याबरोबर मुलगाही राहतो. त्यालाही करोनाची लागण होण्याची भीती असल्याने आम्ही दोघांनी नामांकित खासगी लॅबमध्ये आरटीपीसीआर चाचणी केली. २७ तारखेला केलेल्या चाचणीचा अहवाल २४ तासांच्या आत मिळाला. यात आम्ही दोघे निगेटिव्ह असल्याचे सांगण्यात आले. पॉझिटिव्ह अहवाल दिल्यानंतर महापालिकेतून वारंवार फोन करून 'खासगी रुग्णालय किंवा करोना केंद्रामध्ये भरती व्हा, गृहविलगीकरणात राहू नका', असे सांगण्यात आल्याचे मांजरेकर यांनी सांगितले. 'मला कोणतीही लक्षणे नाहीत, मला केवळ रेल्वे प्रवासासाठी आरटीपीसीआर चाचणी अहवाल हवा आहे,' असे सांगून ही महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात भरती होण्यासासाठी दबाव आणला. २८ ऑगस्टला महापालिकेचे दोन कर्मचारी घरी आले. तुम्हाला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी आलो आहोत', असे त्यांनी सांगितले. हा प्रकार घडत असताना खासगी लॅबचा निगेटिव्ह अहवाल ईमेलवर प्राप्त झाला. त्यामुळे माझ्या मुलाने तो अहवाल दाखवत रुग्णालयात येणार नसल्याचे ठामपणे सांगितले. त्यानंतर कर्मचारी निघून गेले. असे प्रकार थांबवून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. या प्रश्नांची उत्तरे कोण देणार? लक्षणे नसताना पॉझिटिव्ह आल्यास गृहविलगीकरणात राहावे, अशा सूचना या आधी देण्यात आल्या. मग आता रुग्णालयासाठी सक्ती का? महापालिकेच्या यंत्रणेवर विश्वास कसा ठेवायचा? माझी आर्थिक क्षमता होती म्हणून मी आणि मुलाची खासगीत चाचणी केली. ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांनी काय करायचे? सरकार, महापालिकेच्या सदोष यंत्रणेमुळे कल्याण ते बेळगाव जाता-येता तिकीट रद्द करावे लागले, दुसऱ्या दिवशी तात्काळ तिकीट काढून बेळगावी पोहोचले. हा खर्च कोण देणार, असे प्रश्न सुहासिनी मांजरेकर यांनी उपस्थित केले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3zCpFnW
No comments:
Post a Comment