म. टा. प्रतिनिधी, मुंबईः कोकणच्या चाकरमान्यांना यंदा गणपतीबाप्पा पावला आहे. कोकणवासीयांची आवडती समजली जाणारी विशेष दादर-सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस आता २४ डब्यांसह धावणार आहे. कोकण रेल्वेने याबाबत माहिती दिली. या निर्णयामुळे तुतारी एक्स्प्रेसमधील प्रतीक्षायादीतील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. गौरी-गणपतीनिमित्त कोकणातील रेल्वे गाड्यांवर होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता तुतारी एक्स्प्रेसला अतिरिक्त डबे जोडण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक ०१००३/०१००४ दादर-सावंतवाडी रोड-दादर तुतारी एक्स्प्रेस आता २४ डब्यांसह धावणार आहे. ४ ते २५ सप्टेंबर या काळासाठी ही गाडी धावणार आहे. सध्या १९ डब्यांसह ही गाडी धावत असून, हे बदल तात्पुरत्या स्वरूपातील असतील, असे कोकण रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मुंबई-कोकण मार्गावर ६३ अतिरिक्त रेल्वेगाड्यांची घोषणा रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आली आहे. नुकत्याच घोषित झालेल्या गाड्यांव्यतिरिक्त या गाड्या असणार आहेत, अशी घोषणा ट्विटरवरून करण्यात आली. दरम्यान, या गाड्यांबाबत सविस्तर माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. गणपतीनिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी तूर्त कोणत्याही निर्बंधाची गरज नाही, असे राज्य आणि रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे यंदा उत्साहात बाप्पाचे स्वागत करण्यासाठी कोकणवासीय सज्ज झाले आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/38ecHkt
No comments:
Post a Comment