म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई मुंबईतील भांडुप, विक्रोळी, चेंबूर येथे दरड, भिंत कोसळून उद्भवलेल्या भीषण दुर्घटनांनंतर इतर भागांतील धोकादायक वसाहतींच्या समस्येकडे लक्ष वेधले जात आहे. मलबार हिलकडील सिमला नगर ही सुमारे ४० ते ५० वर्षे जुनी झोपडपट्टी उंच टेकडी आणि उतारावर पसरली आहे. भूस्खलनाची भीती आणि जीर्ण झालेल्या संरक्षक भिंतीमुळे येथील चार हजारहून अधिक रहिवाशांचा जीव धोक्यात आला आहे. त्यामुळे या परिसरात झोपडपट्टी पुनर्वसनसारखी योजना राबवण्याची नितांत गरज असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. सिमला नगरमध्ये सुमारे ७५० झोपड्या आहेत. हा भाग उंच टेकडीवर असून तिथे अद्यापही पायाभूत सुविधांचा अभाव आहे. या झोपडपट्टीत ये-जा करण्यासाठी पूर्व आणि दक्षिण दिशेने दोन चिंचोळे मार्ग आहेत. तिथून ये-जा करणे हे ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्तींसह अनेकांना त्रासदायक ठरत आहे. या चिंचोळ्या रस्त्यांमुळे एखाद्या आपत्कालीन प्रसंगात मदतकार्य करणे वा रहिवाशांनाही जीव वाचवणे अवघड ठरू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. टेकडीच्या उताराकडे असलेली संरक्षक भिंत किमान ४० वर्षे जुनी झाली असून धोकादायक स्थितीत असल्याचे स्थानिक सांगतात. त्याबाबत पालिकेस वारंवार माहिती देण्यात आली असली तरी कोणतीच हालचाल होत नसल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. गेल्या महिन्यात मुंबईत काही ठिकाणी झालेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर इथले रहिवासी भयग्रस्त झाले आहेत. चिंचोळे रस्ते तसेच जीर्ण झालेल्या संरक्षक भिंतीमुळे इथले स्थानिक सतत भीतीच्या छायेत असतात. हाच पर्याय इथल्या रहिवाशांचे सुरक्षित पुनर्वसन एसआरए योजनेतून होऊ शकते, असा मतप्रवाह इथे आहे. त्यासाठी विशिष्ट उंचीच्या इमारती उभारण्याचे निर्बंध राज्य सरकारने शिथिल करण्याची मागणी केली जात आहे. तसे केल्यास वरळीप्रमाणेच या भागातील एसआरए योजनांचा मार्ग खुला होईल, अशी पर्यायी सूचना सामाजिक कार्यकर्ते आणि सिमला नगर रहिवासी संघाचे सदस्य दिलीपसिंह नेगी यांनी केली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3jvTDDn
No comments:
Post a Comment