म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई महाड, तळियेपासून चिपळूणपर्यंत मदतीसाठी पोहोचलेल्या पर्यावरणप्रेमी, स्वयंसेवी संस्थांनी प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या संस्थांनी महाडमध्ये नदीकिनारी वाढणारी गृहसंकुले, रो हाऊस प्रकल्प, वीकेण्ड घरे याबद्दल चिंता व्यक्त करत या प्रकल्पांना नदीकिनारी परवानगी कशी मिळते, असा प्रश्न उपस्थित केला आाहे. पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भागांतील झाडे कापून तिथे निवासी प्रकल्प उभे राहताना हरकती का घेतल्या गेल्या नाहीत आणि प्रशासकीय पातळीवर याला चालना कशी मिळाली, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मुंबईतून महाडमध्ये मदतीसाठी गेलेल्या रिव्हरमार्चर विक्रम चोगले यांनी, नदीकिनारी झाडे कापून तिथे अनेक निवासी संकुलांच्या जाहिराती झळकत असल्याने निरीक्षण मांडले. सन २००५मध्ये आलेल्या पुरानंतरही राज्य सरकार, स्थानिक प्रशासन धडे घेत नाही. यामुळे भविष्यातील अशा घटना वाढण्याची भीती आहे, असे ते म्हणाले. अनेक ठिकाणी नदीचे थेट दर्शन, अशा जाहिराती करत हे निवासी संकुलाचे प्रकल्प आकारले जात आहेत. यामध्ये नदीची पूररेषा काय आहे, ही संकुले पूररेषेच्या आत आहेत का, याचाही सामान्य नागरिक अभ्यास करत नाहीत. नदी दिसण्यासाठी नदीच्या काठची झाडे कापली जातात आणि त्याचीही भुरळ लोकांना पडताना दिसते असे ते म्हणाले. मूळ शेतकरी किंवा फळझाडे लावून त्यापासून उत्पन्न घेणारा कोकणी माणूस आज नोकरीच्या शोधात घरदार विकून बाहेर जात आहे. खासगी मालकीची डोंगरावरील जागा विकली जात आहे. गुगल अर्थच्या माध्यमातून जर केवळ महाडचे नकाशे पाहिले तरी सन २००५नंतरच्या निवासी गृहप्रकल्प, निवासी संकुले यांचा वाढता पसारा लक्षात येऊ शकतो, असे स्थानिक पर्यावरणप्रेमी सांगतात. डोंगर उतारांवर रो हाऊस प्रकल्प, फार्महाऊस, हॉटेल यांची उभारणी होत आहे. येथील राजकारणीही अशा प्रकल्पांना पाठिंबा देत असल्याने सामान्यांचा विरोध धुडकावला जात असल्याचे सांगण्यात येते. महाडच्या 'सीस्केप' या प्रेमसागर मेस्त्री अध्यक्ष असलेल्या संस्थेने यासंदर्भात निरीक्षण नोंदवले आहे. योगेश गुरव यांनी एका रात्रीत डोंगर भुंडा केला जातो, असे सांगितले. मुंबईतील बेकरीसाठी महाडमधून झाडे तोडून लाकडे नेली जातात, अशी माहिती गणेश खातू यांनी दिली. 'निर्सगाला दोष का?' वरंधा घाटामध्ये पर्यावरणस्नेही पर्यटनाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात जागा खरेदी केल्या जात आहेत. डोंगरावर सातत्याने सपाटीकरण सुरू राहिले तर दरड कोसळणे, माती वाहून जाणे, याचा दोष निसर्गाला देता येईल का, अशा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3Ahp0sc
No comments:
Post a Comment