Breaking

Thursday, August 5, 2021

तिसऱ्या लाटेपूर्वी चुकांची पुनरावृत्ती टाळण्याची गरज; काय लक्षात घ्यायला हवे? https://ift.tt/3fAno4R

म. टा. विशेष प्रतिनिधी, करोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली असतानाच मागील दोन लाटांपासून आरोग्य व्यवस्थेने कोणता धडा घेतला व त्यामधील कोणत्या चुकांची पुनरावृत्ती टाळणे गरजेचे आहे, याकडे वैद्यकीय तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे. संसर्गाच्या दोन्ही लाटांचा जर तौलानिक अभ्यास केला तर पहिली लाट ही बारा महिन्यांची तर दुसरी लाट चार महिन्यांची होती. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेमधील विषाणूची संसर्ग फैलावण्याची क्षमता अधिक आहे. तसेच रुग्णसंख्या अधिक असतानाही पहिल्या लाटेच्या तुलनेमध्ये मृत्यू कमी झाले, असेही स्पष्ट झाले आहे. संसर्गाची तिसरी लाट आली तर रुग्णसंख्येची वाढ रोखण्यासह मृत्यूचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी काटेकोरपणे प्रयत्न करावे लागणार आहेत. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाने एकत्रितरित्या काम करण्याची गरज आहे. या दोन्ही लाटांमध्ये ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचे दुबळेपणे अधोरेखित झाल्याचे विविध अभ्यासांतून स्पष्ट झाले आहे. टास्क फोर्स समितीचे सदस्य डॉ. सुभाष साळुंखे यांनी तिसऱ्या लाटेचा प्रतिबंध करण्यासाठी केवळ राज्यापुरता विचार न करता देशाच्या आणि जागतिक पातळीवर करोना संसर्गाचे प्रमाण कशाप्रकारे वाढते वा कमी होते, याचा अभ्यास करणे गरजेचे आहे, असे स्पष्ट मत मांडले. डेल्टा विषाणूचा प्रकार लक्षात घेता पुढील दोन महिन्यांत हा विषाणूच्या म्युटेशनचा कालावधी किती आहे, याचाही विचार नियोजनामध्ये हवा, याकडे लक्ष वेधले. रुग्णसंख्या वाढली तर आता राज्यामध्ये जितक्या संख्येने केंद्रांची उपलब्धता आहे त्याच्या दुपटीने ही व्यवस्था असायला हवी याकडेही त्यांनी लक्ष वेधले. राज्याच्या मृत्यूदर विश्लेषण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी, पहिल्या टप्प्यांमध्ये आजाराचे पुरेसे आकलन नव्हते ते संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या वेळी होते, असे सांगितले. दुसऱ्या लाटेमध्ये वापरण्यात आलेल्या आक्रमक उपचारपद्धती, स्टिरॉइडच्या वापरामुळे म्युकरमायकोसिसचा त्रास रुग्णांना झाला. दोन्ही लाटांमध्ये व्हेन्टिलेटर, ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णसंख्या, मृत्यू नेमके कोणत्या कारणांमुळे झाले ते कसे टाळता येतील या प्रत्येक बाबींचा वैद्यकीय अंगाने सूक्ष्मपणे अभ्यास करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तिसऱ्या लाटेमध्ये लक्षणाधारित वैद्यकीय उपचारांनी रुग्ण बरे करणे, मृत्यूदर अतिशय कमी ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज हवी, अशी वैद्यकीय मीमांसा त्यांनी केली. प्रत्यक्ष करोना संसर्गामध्ये कार्यरत असलेल्या वैद्यकीय तज्ज्ञांनी सार्वजनिक संचाराच्या निर्बंधामध्ये सूट देत असताना करोनाला रोखणारे वर्तन काटेकोरपणे व्हायला हवे, याकडे लक्ष वेधले. लसीकरण वाढवा राज्यातील एकूण चित्र पाहिले तर काही जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचा वेग अधिक असतानाही तिथे रुग्णसंख्या वाढताना दिसते. विषाणूच्या परावर्तित झालेल्या स्वरूपाचे हे परिणाम आहेत का, यासंदर्भात अभ्यास सुरू आहे. तिसरी लाट आली तर लसीकरणामुळे संरक्षण मिळेल, मात्र तोपर्यंत वाट पाहण्यापेक्षा लसीकरणाचा वेग अधिक जलदरित्या वाढवायला हवा, अशी मागणी शहरी आणि ग्रामीण भागातील वैद्यकीय तज्ज्ञांकडून केली जात आहे. संसर्गक्षमता अधिक पहिल्या लाटेमध्ये वयोवृद्धांमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक होते तर दुसऱ्या लाटेमध्ये सहआजार असलेल्या वयोवृद्धांसह तरुणांचेही प्राण गेले. रुग्णसंख्या टप्प्याटप्याने वाढली तर दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्येमध्ये प्रत्येक दिवसाला मोठ्या प्रमाणावर वाढ दिसत होती. डेल्टा या विषाणूची संसर्गक्षमता अधिक होती. ... काय लक्षात घ्यायला हवे? -पुणे, सातारा सांगली कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, वसई-विरार, अहमदनगर, औरंगाबाद येथील करोना संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण चिंताजनक आहे. रुग्णसंख्येचा व लक्षणांच्या तीव्रतेचा जिल्हानिहाय अभ्यास करण्याची गरज आहे. त्यामुळे कोणत्या जिल्ह्यामध्ये संसर्गाची तीव्रता किती आहे, हे लक्षात येईल. -साठ वर्षे वयोगटावरील ४८.८३ टक्के मृत्यूंची नोंद आतापर्यंत झाली आहे. -मुंबई आणि राज्यात म्युकरमायकोसिसमुळे प्राण गेलेल्यांची संख्या चिंताजनक आहे. -अहमदनगर, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, लातूर, हिंगोली, नंदूरबार, नाशिक पालिकाक्षेत्र, उल्हासनगर पालिकाक्षेत्रामध्ये पहिल्या लाटेमध्ये संसर्गामुळे झालेल्या मृत्यूचे प्रमाण कमी होते तिथे दुसऱ्या लाटेमध्ये हे प्रमाण वाढताना दिसत आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/37og1Jq

No comments:

Post a Comment